"आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" अमित भानुशालीची भावनिक पोस्ट, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:59 IST2025-08-31T14:58:36+5:302025-08-31T14:59:05+5:30

अमित भानुशालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Amit Bhanushali's Emotional Post On The Birthday Of Jyoti Chandekar After Her Death | "आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" अमित भानुशालीची भावनिक पोस्ट, म्हणाला…

"आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" अमित भानुशालीची भावनिक पोस्ट, म्हणाला…

'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'ठरलं तर मग' या मालिकेतील सहकलाकार आणि अभिनेता अमित भानुशालीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अमित भानुशालीनं लिहलं, "आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... आज तुझा वाढदिवस आहे… आणि तुझी आठवण आज जरा जास्तच येत आहे. तू माझ्यासाठी फक्त एक अभिनेत्री नव्हतीस, जिच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. तू माझ्यासाठी माझी आजी होतीस.  तुझं अभिनय कौशल्य, तुझं व्यक्तिमत्त्व आणि तुझं निरागस प्रेम… हे सगळं अजूनही मनात कोरलेलं आहे. आजी, तू नेहमी आशिर्वादासारखी, सावलीसारखी माझ्या प्रत्येक पावलावर आहेस".

अमित म्हणाला, "आपण सेटवर केलेली मस्ती ते जोर जोरात हसणे, अजूनही कानात घुमतात. अजूनही आठवतंय, तू पुण्याहून क्रीम रोल आणि भाकरवडी घेऊन यायचीस आणि किती उत्साहाने सगळ्यांमध्ये वाटायचीस. सीनच्या मध्ये-मध्ये तू नेहमी मला बाजूला घेऊन म्हणायचीस – “बाळा, अजून चांगलं करू शकतोस, तुझ्यात तो कौशल्य आहे" आणि तुझ्या त्या शब्दांतून मी केवळ अभिनयच नाही, तर माणूसपणही शिकलो. आजी, ती तुझी खुर्ची… अजूनही रिकामीच आहे. आठवतंय, मी मुद्दाम तुझ्या खुर्चीत बसायचो आणि जेव्हा तू यायचीस तेव्हा नकळत तुझ्याकडे न पाहिल्यासारखं वागायचो. मग अचानक उठून तुला खुर्ची देऊन हसायचो आणि तू छडी दाखवून खोटं-खोटं रागवायचीस… तो गोडपणा आजही माझ्या डोळ्यांत पाणी आणतो".

पुढे त्यानं लिहलं, "तुझ्यातलं सगळ्यात अनोखं असं होतं, तू सगळ्यांमध्ये सहज मिसळून जायचीस. तरुणांमध्ये तू एक खोडकर मूल व्हायचीस, आम्हाला शिकवताना आईसारखी प्रेमळ असायचीस आणि माझ्यासाठी खरी आजी – जिचं ममत्व, जिचं प्रेम शब्दांपलीकडचं होतं. आज सेटवर जाताना अजूनही माझे डोळे तुलाच शोधतात. माहीत आहे की तू नाही आहेस, सगळ कळत मला तरी सुद्धा अजूनही वाटतं, त्या दारातून तूच आत येशील आणि तुझ्या तेजस्वी स्मितहास्याने "गुड मॉर्निंग" म्हणशील.आजी, तू जरी शारीरिक स्वरूपात आमच्यात नसलीस तरी, माझी लाडकी आजी, माझी प्रेरणा, माझं बळ म्हणून … तू सदैव माझ्यासोबत आहेस. या सुंदर दिवशी तुला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.लव्ह यू ऑलवेज, आजी. माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा".


Web Title: Amit Bhanushali's Emotional Post On The Birthday Of Jyoti Chandekar After Her Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.