इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये झळकणार अक्षया नाईक, अभिनेत्री म्हणाली- "माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:11 IST2025-12-18T12:10:34+5:302025-12-18T12:11:37+5:30
Akshaya Naik :'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत सुंदराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये झळकणार अक्षया नाईक, अभिनेत्री म्हणाली- "माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे."
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत सुंदराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. वर्षाच्या अखेरीस तिने प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ती अभिनेता इमरान हाश्मीची आगामी वेबसीरिज 'तस्करी'मध्ये झळकणार आहे. ती पहिल्यांदाच त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करते आहे.
अलिकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या 'तस्करी' या वेबसीरिजमध्ये इमरान हाश्मीसोबत अमृता खानविलकर दिसणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अक्षया नाईकदेखील या सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल अक्षया म्हणाली की, "इमरान हाश्मी सरांसारख्या बॉलिवूडच्या मोठ्या स्टार सोबत आपण काम करतोय ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे अगदीच २ ते ३ सीन होते पण ते करताना देखील थोडं दडपण आलं आणि तेवढं छान सुद्धा वाटलं. पहिली वेबसीरिज आणि सहकलाकार म्हणून इमरान हाश्मी सरांसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे, असं मला वाटतं."
अक्षयाने सोशल मीडियावर इमरान हाश्मीसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, "सध्या मला खूप काही बोलायचे आहे, शेअर करायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे आणि आनंदाने ओरडून सांगायचे आहे! पण सध्या तरी, मी त्या प्रत्येकाची ऋणी आहे ज्यांनी माझ्या या प्रवासात मला साथ दिली आणि जे मला १४ जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर 'तस्करी : द स्मगलर्स वेब'मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत! माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद."
वर्कफ्रंट
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहचली. तिचे अनेक चाहते आहेत. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने आणखी काही प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.