Akshaya Deodhar-Hardik Joshi : मला माझ्या लग्नात..., लग्नानंतर पाठकबाईंनी शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 10:20 IST2022-12-04T10:19:11+5:302022-12-04T10:20:03+5:30
Akshaya Deodhar-Hardik Joshi : लग्नासाठी अक्षयानं खास पारंपरिक लुक निवडला होता. आता अक्षयाने या लुकबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Akshaya Deodhar-Hardik Joshi : मला माझ्या लग्नात..., लग्नानंतर पाठकबाईंनी शेअर केली खास पोस्ट
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) व अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले. गेल्या 2 डिसेंबरला या जोडप्याचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. राणादा व पाठबाईच्या लग्नाचा एक एक फोटो सुंदर आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
लग्नासाठी अक्षयानं खास पारंपरिक लुक निवडला होता. अगदी हातामागावर विणलेली सुंदर लाल रंगाची नऊवारी, नाकात नथ, त्यावर साजेसे पारंपरिक दागिने असा सगळा तिचा थाट बघण्यासारखा होता. हार्दिकनेही लग्नासाठी धोतर आणि कुर्ता अशा पारंपरिक पोशाख निवडला होता. या जोडप्याच्या या पारंपरिक, मराठमोळ्या लुकची सध्या जाम चर्चा आहे. आता अक्षयाने या लुकबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
‘मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिने आणि सगळं टिपिकल. कारण मला आवडतं..,’अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. अक्षयाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. आता खरोखरच तुझ्यात जीव रंगला, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अक्षया व हार्दिक ही जोडी एकत्र दिसली आणि या जोडीनं प्रेक्षकांना वेड लावलं. आता ही ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे आणि चाहतेही खूश आहेत.