अभिनेत्याने भाविकाप्रमाणे रांगेत उभं राहून घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, चाहत्यांची सेल्फीसाठी गर्दी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:56 IST2025-10-26T14:54:21+5:302025-10-26T14:56:14+5:30
अभिनेत्यानं तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्याचा हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे

अभिनेत्याने भाविकाप्रमाणे रांगेत उभं राहून घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, चाहत्यांची सेल्फीसाठी गर्दी!
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) सध्या त्याच्या चर्चेत आहे. अजिंक्यने नुकतंच महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूरच्या देवी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्याचा हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अजिंक्य राऊत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने लिहलं, "प्रत्येक वेळी चित्रपट किंवा प्रोजेक्ट रिलीज होताना टीमसोबत VIP दर्शन घेत घेत कंटाळा आला होता… या वेळी मनापासून इच्छा होती.जशी प्रत्येक खरी भक्तजनं घेतात तशीच रांगेत उभं राहून तुळजापुरच्या भवानी मातेचं दर्शन घ्यायचं. ५ तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाभला त्या आदीमायेचा आशीर्वाद. मनापासून धन्य झालो".
तर व्हिडीओमध्ये अजिंक्यने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं, "VIP दर्शनात काही ठेवलेलं नाही. यावेळी माझ्या हातात होतं तर मी आवर्जून इथे आलोय. प्रत्येकवेळी नव्या प्रोजेक्टच्या आधी VIP दर्शन करुन करुन असं वाटलं की आपण देव्हाऱ्यालाच आव्हान देतोय की काय. त्यामुळे या वेळी मनापासून इच्छा होती की जशी प्रत्येक खरी भक्तजनं घेतात तशीच रांगेत उभं राहून तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घ्यायचं.. असं दर्शन घेतल्यावर आशिर्वाद मिळू शकतो असं मला वाटतं".
अजिंक्यने तब्बल पाच तास रांगेत उभे राहून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्याचा हा अनुभव खूप खास आणि भावनिक होता. एका लोकप्रिय अभिनेत्याने कोणतीही सेलिब्रिटी ट्रीटमेंट न घेता, सामान्य भाविक म्हणून दर्शन घेतल्यामुळे चाहते त्याच्या साधेपणाचे आणि भूमिकेचे प्रचंड कौतुक करत आहेत. अजिंक्यची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.