ईशा केसकरची एक्झिट पडली महागात! अवघ्या महिनाभरात मालिकेने गाशा गुंडाळला, कधी, कसा होणार शेवट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:05 IST2025-12-11T13:03:19+5:302025-12-11T13:05:29+5:30
ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच मालिका संपणार!'असा'होणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'चा शेवट, प्रेक्षक म्हणाले-"इतक्या लवकर..."

ईशा केसकरची एक्झिट पडली महागात! अवघ्या महिनाभरात मालिकेने गाशा गुंडाळला, कधी, कसा होणार शेवट?
Laxmichya Paulani: छोट्या पडद्यावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. मालिकेतील अद्वैत-कलाच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं. अक्षर कोठारी, ईशा केसकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये य कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली ही टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर असायची. दमदार कथानक आणि मल्टिस्टारर असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे चाहते देखील नाराज झाले आहेत.
अलिकडेच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकरने एक्झिट घेतली. तिच्या या निर्णयाचा प्रेक्षकांना धक्काच बसला होता. तिने प्रकृतीच्या कारणास्तव आपण मालिका सोडल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्याचा फटका मालिकेला बसल्याचा दिसतोय. ईशाच्या एक्झिटनंतर मालिकेत सुकन्या नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री झाली. त्याला महिनाही पूर्ण झालेला नसताना 'लक्ष्मीच्या पावलांनी ' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
असा असणार शेवट...!
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत चांदेकरांच्या संपत्तीवर डोळा असणारी रोहिणी तिचा लेक राहुलबरोबर मिळून संपूर्ण चांदेकर कुटुंबाला संपवण्याचा कट रचते. त्यासाठी केकेमध्ये विष मिसळून ती घरातील सर्वांना खायला देते. सगळे निपचित खाली पडल्यानंतर रोहिणी स्वत तिच्या पापांचा पाढा वाचते आणि भांडाफोड होते."अखेर अद्वैत करणार रोहिणीच्या कारस्थानांचा पर्दाफाश…", असं कॅप्शन देत वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. येत्या १२ डिसेंबरला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अंतिम भाग प्रसारित केला जाणार आहे.
दरम्यान, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने गेली काही वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. त्यामुळे ही मालिका संपणार असल्याचं कळताच प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहेत. हा प्रोमो पाहून "कलाची अशी एक्झिट आणि इतक काही बाकी असताना मालिका खूप लवकर निरोप घेत आहे हे खूप वाईट वाटण्याची गोष्ट झाली...", तसेच "एवढा लवकर अपेक्षित नव्हतं...", अशा कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.