योगिता चव्हाण टीव्हीवर परतली! नव्या मालिकेत वर्णी लागली, सोबतीला दिसणार 'हा' हॅण्डसम हंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:02 IST2025-12-03T12:59:34+5:302025-12-03T13:02:02+5:30
योगिता चव्हाणचं मालिकाविश्वात दमदार पुनरागमन, प्रोमो आला समोर, तिच्यासह हा अभिनेता झळकणार

योगिता चव्हाण टीव्हीवर परतली! नव्या मालिकेत वर्णी लागली, सोबतीला दिसणार 'हा' हॅण्डसम हंक
Yogita Chavan Comeback On Tv: छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. एकामागून एक नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकांच्या माध्यमातून काही कलाकार पुनरागमन करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्री जवळपास दोन वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करते आहे. ही अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण. जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी योगिता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
योगिता चव्हाण ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जीव माझा गुंतला या मालिकेतील तिने साकारलेलं 'अंतरा' नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातही सहभागी झाली होती. त्यानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर ती टीव्हीवर पुनरागमन करते आहे. सन मराठीवरील आगामी 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेतून ती रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती अर्पिता नावाची भूमिका साकारणार आहे. येत्या ५ जानेवारीपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
सोबतीला आहे हा अभिनेता...
दरम्यान, 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेत योगितासोबत अभिनेता अंबर गणपुळे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून ही प्रेश जोडी प्रेक्षकांच्या पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. अंबर गणपुळेच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने याआधी रंग माझा वेगळा, दुर्वा यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.