देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:32 IST2026-01-04T12:30:57+5:302026-01-04T12:32:05+5:30
घरी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात देवीची पूजा करताना लोकप्रिय अभिनेत्रीच्या अंगात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल झाला आहे

देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या देवीच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. सुधा चंद्रन यांच्या घरी 'माता की चौकी' या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमादरम्यान सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याचं दिसत आहे. ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्यांना अभिनेत्रीला सांभाळणे कठीण झाले होते.
रिपोर्टनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन या देवीच्या भक्तीत मंत्रमुग्ध झालेल्या दिसत आहेत. एका क्षणी त्यांच्या अंगात आल्याने अभिनेत्रीचं स्वतःवरील नियंत्रण सुटल्याचं दिसतं. त्यामुळे कुटुंबीय आणि पुजाऱ्यांनी सुधा चंद्रन यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचा दिसतोय.
सुधा चंद्रन या दरवर्षी आपल्या घरी मोठ्या उत्साहात माता की चौकीचे आयोजन करतात. या धार्मिक कार्यक्रमाला टेलिव्हिजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावतात. याही वेळी त्यांच्या घरातील वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक झाले होते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सुधा चंद्रन या देवीच्या भक्तीत कशा हरवून गेल्या आहेत, हे पाहून लोक थक्क झाले आहेत.
सुधा चंद्रन या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाहीत, तर त्यांनी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने आयुष्यातील अनेक संकटांवर मात केली आहे. अपघातात एक पाय गमावूनही त्यांनी नृत्याच्या क्षेत्रात जागतिक ओळख निर्माण केली. सध्या त्या 'नागिन' आणि 'दोरी' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सुधा चंद्रन या अभिनेत्री म्हणून अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.