"असा शेवट होणं मलाही पटत नाही,पण...", 'पारु' मालिका संपल्यावर अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:25 IST2026-03-18T13:16:15+5:302026-03-18T13:25:08+5:30
"शेवट अतिशय वाईट…", पारु मालिका अचानक बंद झाल्याने अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली-"हे पटण्यासारखं नाही, पण..."

"असा शेवट होणं मलाही पटत नाही,पण...", 'पारु' मालिका संपल्यावर अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत
Paaru Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणार्या मालिकांपैकीच पारू ही मालिका होती. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. त्यानंतर अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र,अलिकडेच महिनाभरापूर्वी ही मालिका संपली.मालिकेचा असा अपूर्ण शेवट होणं अनेकांना खटकलं. मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षक संभ्रमात होते. अशातच पारुमधील मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांच्या सगळ्या शंका दूर केल्या. तसेच मालिका संपल्यामुळे तिने प्रेक्षकांची माफी सुद्धा मागितली.
काही तांत्रिक आणि प्रॉडक्शनच्या अडचणींमुळे मालिकेचा योग्य शेवट दाखवता आला नाही. ‘पारू’ मालिका अचानक बंद करण्यात आली आणि विशेष म्हणजे तिचा शेवटही दाखवण्यात आला नाही. शरयूच्या या व्हिडीओ मालिकेत दामिनी नावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंतने आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर करत म्हटलंय, "“दा ..मि…नी”. दामिनी हे नाव माझ्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी निघून जाणं मला पटण्यासारखं नाही आहे आणि कदाचित तुम्हालाही. पण सिरीयल निरोप घेते. हा निरोप जसा आमच्यापर्यंत इतक्या अव्यवस्थितपणे आला तितका तुम्हाला सांगणं मला उचित वाटत नव्हतं.आज सिरीयल संपून सवळजवळ एक महिना झाला. पण दामिनी किर्लोस्कर हे नाव माझ्या कानात अजूनही तसंच घुमतंय. मला अजूनही दामिनी हे नाव ऐकल्यानंतर कुठेतरी असं वाटतंय की आपल्याला कोणीतरी बोलवतंय. पण हा शेवट अतिशय वाईट होता. मी समजू शकते तुम्हाला ही मालिका प्रचंड आवडायची. आणि मलासुद्धा पारू या मालिकेने भरभरून दिलं. म्हणजे जवळजवळ “झी मराठीचं” पहिलं अवॉर्ड हे या मालिकेमुळंच मिळालं. त्याचबरोबर मला उत्कृष्ट असे दिग्दर्शक,उत्कृष्ट DOP हे ह्याच मालिकेमुळे मिळाले."
यापुढे श्रुतकिर्ती सावंतने लिहिलंय, "आता ही मालिका निरोप घेती आहे पण तुम्ही अजिबात हताश होऊ नका. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन. एका नव्या अंदाजात आणि एका नव्या उर्जेने, तोपर्यंत सोबत रहा. पारूचा हा असा शेवट होणं,हे मलाही पटत नाहीये पण काही फायनान्शियल प्रॉब्लेम झाल्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला आणि आम्हीही खूप आर्थिक संकटात अडकलो आहोत. त्याच्यावर काय उपाय काढता येईल तेही आमचं सुरूच आहे पण तुमची सोबत हवी आहे. चला… Thank you so much...".
अभिनेत्रीने पुढे मनातील भावना व्यक्त करत म्हटलंय,"मनापासून मी माझ्या सर्व प्रेक्षकांचे, विशेषतः झी मराठीच्या प्रेक्षकांचे, मनःपूर्वक आभार मानते. दामिनी हे माझं जीवापाड आवडतं पात्रं आहे आणि मी ते तितकंच मन लावून ही व्यक्तिरेखा साकारली . या भूमिकेने मला तुमच्या प्रेमाचं, पाठिंब्याचं, आणि अविश्वसनीय भावनिक बंधनाचं दर्शन घडवलं. प्रत्येक सीन, प्रत्येक भाव, मी दिलं तसंच तुम्ही समजून घेतलं,स्वीकारलं. आणि तुम्ही मला जे प्रेम दिलंत, जे मी कधीही विसरू शकणार नाही. जरी ही सिरियल संपली असली, तरी “दामिनी” हे नाव माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मी कलाकार म्हणून, अजून काही खास गोष्टी घेऊन, एका नवीन उर्जेने, पुन्हा भेटीन. तुम्ही माझ्याबरोबर आहात हा माझा विश्वास आहे, आणि मी पुन्हा तुमच्या समोर एक सुंदर कलात्मक प्रवास घेऊन येईन. तोपर्यंत रजा घेते…!" अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.