कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता शाही थाटात लग्न करणार 'ही' अभिनेत्री, सासरे आहेत प्रसिद्ध अभिनेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:14 IST2025-12-01T17:10:43+5:302025-12-01T17:14:09+5:30
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता ही अभिनेत्री शाही थाटात लग्न करणार आहे

कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता शाही थाटात लग्न करणार 'ही' अभिनेत्री, सासरे आहेत प्रसिद्ध अभिनेते
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सारा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड क्रिश पाठक याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. क्रिश पाठक हा 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा आहे. सारा आणि क्रिश यांनी त्यांच्या ग्रँड वेडिंगची तारीख जाहीर केली असून, हा सोहळा ५ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
कोर्ट मॅरेजनंतर आता ग्रँड वेडिंग
सारा खान आणि क्रिश पाठक यांनी ६ ऑक्टोबर रोजी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले होते. आता हे दोघे पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. सारा खानने सोशल मीडियावर क्रिश पाठकसोबतचा एक सुंदर प्री-वेडिंग व्हिडिओ शेअर करत अधिकृतपणे लग्नाची तारीख ५ डिसेंबर असल्याचे जाहीर केले आहे. या व्हिडिओमध्ये सारा हिरव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये, तर क्रिश पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे. दोघांनी रोमँटिक अंदाजात व्हिडीओशूट केलं आहे.
'लक्ष्मणा'च्या मुलाच्या लग्नाची चर्चा
या लग्नाची चर्चा एका कारणाने होत आहे, ती म्हणजे हे आंतरधर्मीय लग्न आहे. सारा खान मुस्लिम आहे, तर क्रिश पाठक हिंदू आहे. या प्री-वेडिंग व्हिडिओमध्येही हे कपल कधी मंदिरासमोर तर कधी मशिदीसमोर फोटोशूट करताना दिसत आहे.
क्रिश पाठक हा 'रामायण' फेम अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा आहे. क्रिशच्या लग्नाबद्दल सुनील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यामुळे सुनील मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
सारा आणि क्रिश यांची कारकीर्द
सारा खान आणि क्रिश पाठक दोघेही टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरे आहेत. सारा खानने २००७ मध्ये 'सपना बाबुल का… बिदाई' या मालिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय 'बिग बॉस ४', 'ससुराल सिमर का' आणि 'भाग्यलक्ष्मी' यांसारख्या अनेक लोकप्रिय शोजमध्ये तिने काम केले आहे. दुसरीकडे क्रिश पाठकने 'पीओडब्ल्यू: बंदी युद्ध के' आणि 'ये झुकी झुकी सी नजर' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करुन आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.