लग्नानंतर ९ वर्षांनी मिळाली होती गुडन्यूज, तिसऱ्या महिन्यात झाला गर्भपात; अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:59 IST2024-12-20T10:59:07+5:302024-12-20T10:59:31+5:30
अभिनेत्री आणि तिच्या पतीने व्लॉग शेअर करत ही माहिती दिली. दोघंही या महिन्यात चाहत्यांना गुडन्यूज देणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

लग्नानंतर ९ वर्षांनी मिळाली होती गुडन्यूज, तिसऱ्या महिन्यात झाला गर्भपात; अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
अभिनेत्री संभावना सेठवर (Sambhavna Seth) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ती वयाच्या ४४ व्या वर्षी बाळाला जन्म देणार होती. ती तीन महिन्यांची गरोदर होती. मात्र प्रेग्नंसी कॉम्प्लिकेशनमुळे तिचा गर्भपात झाला आहे. संभावना यामुळे प्रचंड धक्क्यात असून तिने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. लग्नानंतर ९ वर्षांनी संभावना गरोदर राहिली होती. संभावना आणि पती अविनाश यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मात्र आता त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.
संभावना सेठ आणि पती अविनाश यांनी काल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ही दु:खद बातमी दिली. तसंच त्यांनी युट्यूब व्लॉग करत सर्व घटना सांगितली. यामध्ये अविनाश म्हणतो, "काही वर्षांपासून आम्ही आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे प्रेग्नंसीचा प्रयत्न करत होतो तरी आम्हाला यश मिळत नव्हतं. यावर्षी संभावना गरोदर राहिली. मात्र यावर्षीच आम्हाला गुडन्यूज मिळाली. संभावना गरोदर राहिली. तीन महिनेही पूर्ण झाले मात्र तिचा गर्भपात झाला. आम्ही बाळासाठी बरीच तयारी करत होतो. संभावनाची आम्ही खूप काळजी घेत होतो. मात्र देवाच्याच मनात नसावं. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की इतकं सगळं सुरळीत सुरु होतं तरी असं का झालं. डॉक्टरांनी अगदी जुळे होऊ शकतात असंही सांगितलं होतं. आम्ही खूप खूश होतो. आम्ही तर प्रेग्नंसीची आस लावून बसलो होतो आणि डॉक्टरांनी थेट जुळ्यांचा उल्लेख केला. मला संभावनासाठी खूप वाईट वाटत आहे."
नंतर संभावना म्हणाली, "या संपूर्ण प्रक्रियेत मी ६५ इंजेक्शन्स घेतले. हे सगळं खूप वेदनादायी होतं पण बाळासाठी मी ते आनंदाने केलं. जेव्हा मला वाटलं की इंजेक्शन्स आता बंद होतील तेव्हा माझ्या बाळाच्या हृदयाचे ठोकेच थांबले."
संभावना सेठने २०१६ साली अविनाश द्विवेदीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तब्बल ९ वर्षांनी ते आईबाबा होणार होते. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.