"‘चार दिवस सासूचे’ या मालिकेनंतर आता १३ वर्षांनी...", 'ठरलं तर मग'मध्ये रोहिणी हट्टंगडींच्या एन्ट्रीनंतर अभिनेत्रीची पोस्ट
By कोमल खांबे | Updated: October 20, 2025 13:23 IST2025-10-20T13:22:50+5:302025-10-20T13:23:34+5:30
पूर्णा आजीबरोबरच रोहिणी हट्टंगडींसोबत पुन्हा काम करायला मिळणार असल्याने अभिनेत्री प्राजक्ता दिघे खूश आहेत. याआधीही त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत काम केलं आहे.

"‘चार दिवस सासूचे’ या मालिकेनंतर आता १३ वर्षांनी...", 'ठरलं तर मग'मध्ये रोहिणी हट्टंगडींच्या एन्ट्रीनंतर अभिनेत्रीची पोस्ट
'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेली लोकप्रिय मालिका. या मालिकेत पूर्णा आजी साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता मालिकेत रोहिणी हट्टंगडी यांची एन्ट्री झाली आहे. रोहिणी हट्टंगडी आता पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर रोहिणी हट्टंगडी यांचं कलाकारांनी स्वागत केलं. त्यांना पाहून कलाकारांचा आनंद गगनात मावत नव्हता.
पूर्णा आजीबरोबरच रोहिणी हट्टंगडींसोबत पुन्हा काम करायला मिळणार असल्याने अभिनेत्री प्राजक्ता दिघे खूश आहेत. प्राजक्ता या मालिकेत कल्पना म्हणजे पूर्णा आजीच्या सूनेची भूमिका साकारत आहेत. याआधीही त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत काम केलं आहे. 'चार दिवस सासूचे' या मालिकेत रोहिणी हट्टंगडी आणि प्राजक्ता दिघे सासू-सूनेच्या भूमिकेत होत्या. आता १३ वर्षांनी पुन्हा हा योग जुळून आला आहे. त्यामुळे त्या उत्साही आहेत.
प्राजक्ता दिघे यांनी रोहिणी हट्टंगडी म्हणजेच नव्या पूर्णा आजीसोबतचा सेटवरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "‘चार दिवस सासूचे’ या मालिकेनंतर ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पुन्हा एकदा १३ वर्षांनंतर सासू-सुनेच्या भूमिकेत झळकणार!", असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. पूर्णा आजीला ‘ठरलं तर मग’मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. त्यामुळे ही नवी पूर्णा आजी चाहत्यांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.