गंभीर आजारपणानंतर मराठमोळ्या अभिनेत्याचे तब्बल अडीच वर्षानंतर मालिकेत कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:10 IST2025-01-20T11:09:47+5:302025-01-20T11:10:36+5:30
गंभीर आजारावर मात करत तब्बल अडीच वर्षांनंतर या अभिनेत्याने कलाविश्वात पुनरागमन केले आहे.

गंभीर आजारपणानंतर मराठमोळ्या अभिनेत्याचे तब्बल अडीच वर्षानंतर मालिकेत कमबॅक
स्टार प्रवाह(Star Pravah)च्या 'येडं लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लवकरच मालिकेत अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी (Vidyadhar Joshi) यांची एन्ट्री होणार आहे. उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. ते बराच काळ अभिनयापासून दूर होते. गंभीर आजारावर मात करत तब्बल अडीच वर्षांनंतर त्यांनी कलाविश्वात पुनरागमन केले आहे.
मागील दोन अडीच वर्षे विद्याधर जोशी एका गंभीर आजाराशी सामना करत होते. कोरोना काळात त्यांना अनेक त्रास जाणवू लागले. पण उपचार घेऊनही आजाराचे निदान होत नव्हते. एका तपासणी नंतर त्यांना फुफ्फुसाचा फायब्रॉसिस हा आजार झाल्याचे लक्षात आले. पण यावर उपचार नसल्यामुळे डॉक्टरही काही उपाय करू शकत नव्हते. पण आता या आजारावर मात करून विद्याधर जोशी वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.
आजारपणामुळे सोडावी लागली होती मालिका
विद्याधर जोशी यांना फुप्फुसातील फायब्रॉसिस हा दुर्धर आजार झाला होता. सतत दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे यामुळे ते त्रस्त होते. एका महिन्यातच त्यांचा हा आजार वाढत जाऊन ६० टक्के फुफ्फुस निकामी झाले होते. तेव्हा डॉक्टरांनी फुफ्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. जीवाची होतीया काहिली मालिकेतून ते या आजारपणामुळे अचानक बाजूला झाले होते. तेव्हा ते मालिकेतून का बाहेर पडले अशी चर्चा पाहायला मिळाली होती.
अशी केली विद्याधर जोशींनी आजारावर मात
शेवटी फुफ्फुस प्रत्यारोपण ही खर्चिक शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या एका नातेवाईकाने ही शस्त्रक्रिया केली होती, त्याबद्दल योग्य ती माहिती घेऊन विद्याधर जोशी या शस्त्रक्रियेसाठी तयार झाले. सुरुवातीला खूप खर्च लागणार असल्याने माझ्यावर एवढे पैसे खर्च का करता असा त्यांचा घरच्यांना प्रश्न होता. पण पत्नीच्या समजवल्यानंतर ते तयार झाले. आता तब्येत बरी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे.