Subodh Bhave : "पेट्रोल-डिझेलने सोन्या-चांदीची मस्ती उतरवली, दागिने पण यांचेच करणार"; सुबोध भावेची 'ही' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 16:13 IST2021-10-10T15:54:24+5:302021-10-10T16:13:20+5:30
Actor Subodh Bhave And Petrol diesel Price hike : अभिनेता सुबोध भावे याने उपरोधिक शैलीत भाष्य केलं आहे. "सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे" असं म्हटलं आहे.

Subodh Bhave : "पेट्रोल-डिझेलने सोन्या-चांदीची मस्ती उतरवली, दागिने पण यांचेच करणार"; सुबोध भावेची 'ही' पोस्ट चर्चेत
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून इंधनाची दरवाढ थांबता थांबेना, असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. या नव्या वाढीसह डिझेल दरवाढीचा प्रति लिटरचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे. डिझेलने शतक गाठले आहे. कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच दरम्यान आता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने उपरोधिक शैलीत यावर भाष्य केलं आहे. "सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे" असं म्हटलं आहे.
सुबोध भावे याने एक फेसबुक पोस्ट केली असून सध्या सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत केली आहे. "सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही.... कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार" असं म्हटलं आहे.
"स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद" असं देखील सुबोध भावेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल 80 डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटाच लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे.
17 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटर
युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत.