Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:09 IST2025-11-08T12:09:02+5:302025-11-08T12:09:44+5:30
सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय

Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वात एका अभिनेत्याच्या लग्नाची जोराच चर्चा आहे. हा अभिनेता म्हणजे सोहम बांदेकर. सेलिब्रिटी कपल आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांचा लेक सोहम गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. आता सोहम बांदेकरचं लग्न खरंच ठरलं आहे. कारण मराठी अभिनेत्रींनी सोहमचं खास केळवण केलं आहे. याविषयीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घ्या
सोहम बांदेकरचं झालं केळवण
मराठी अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले आणि अभिनेता अभिजीत केळकर या सर्वांनी मिळून सोहम बांदेकरच्या केळवणाचा घाट घातला. यावेळी सोहमचे आई-बाबा म्हणजेच आदेश आणि सुचित्रा उपस्थित होते. सोहमने खास मुंडावळ्या बांधल्या होत्या. सोहम आणि बांदेकर कुटुंब येताच त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. याशिवाय पेढा भरवत चाफ्याच्या फुलांनी त्यांचं स्वागत केलं. नंतर औक्षण करण्यात आलं. जेवणाच्या ताटाभोवती मोत्यांची सजावट करण्यात आली. अशाप्रकारे सोहमसाठी मराठी अभिनेत्रींनी झकास केळवण केलं. सर्वांनी मिळून सोहमला खास गिफ्टही दिलं.
कोण होणार बांदेकर कुटुंबाची सून?
गेल्या अनेक दिवसांपासून सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारीमध्ये काहीतरी शिजतंय, अशी चर्चा रंगली आहे. सोहम आणि पूजाने याविषयी अजून जाहीर खुलासा केला नाहीये. परंतु यंदा बांदेकर कुटुंबाच्या गणेशोत्सवात पूजा बिरारीच्या उपस्थितीने या चर्चांवर शिक्कामोर्तब बसला आहे. त्यामुळे पूजा बिरारी ही बांदेकर कुटुंबाची सून होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सोहम बांदेकरच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित नाही. सोहम सध्या बांदेकर कुटुंबाच्या निर्मिती संस्थेची धुरा सांभाळताना दिसतो.