"हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:11 IST2025-03-03T10:11:39+5:302025-03-03T10:11:59+5:30

मिलिंद गवळींनी त्यांच्या आईबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आईबद्दल लिहिताना मिलिंद गवळी भावुक झाले आहेत.

actor milind gawali shared emotional post for her mother | "हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

"हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ते चर्चेत होते. मालिकेत त्यांनी अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारली होती. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्यांच्या पोस्टची प्रचंड चर्चा असते. 

मिलिंद गवळींनी त्यांच्या आईबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आईबद्दल लिहिताना मिलिंद गवळी भावुक झाले आहेत. 

मिलिंद गवळींची पोस्ट

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" ही म्हण अगदी खरी आहे. आज माझ्या आईची सोळावी पुण्यतिथी. गेली १६ वर्ष मी पोरका आहे. सोळा वर्षे ज्यांना ज्यांना आई आहे त्यांचा मला हेवा वाटतो. पण कोणाची आई माझ्या आई इतकी सुंदर कधीच मला वाटली नाही. माझा जर पुनर्जन्म असेल तर मला माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं आहे.

माझ्या आईला सात भावंडं, तीन भाऊ आणि चार बहिणी, माझ्या आजी-आजोबांना आठ मुलं. आणि माझ्या आजीची म्हणजेच लक्ष्मीबाईची माझी आई म्हणजेच सुशीलाच लाडकी होती. हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात. माझी आजी आठ मुलांचं संगोपन करत होती. आठ मुलांना सांभाळायचं काय साधी गोष्ट आहे का? म्हणून मग माझी आई तिच्या वयाच्या सातव्या वर्षापासून तिच्या आईला स्वयंपाकात आणि घर कामात मदत करू लागली, आणि आईला मदत करता करता ती स्वतः सुगरण कधी झाली हे तिला कळलंच नाही. 

माझ्या आईचा पोळ्या करण्याचा speed इतका होता की आठ माणसं एका वेळेला जेवायला बसली की ती त्यांना ताटात गरम गरम पोळ्या वाढत असे. आणि त्या आठही जणांच्या पोळ्या खाऊन होईपर्यंत दुसऱ्या गरम पोळ्या त्यांच्या ताटात असायच्याच आणि प्रत्येकाला सात आठ पोळ्या खाऊ घातल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. बरं पोळ्या लाटत असताना, कोणाची भाजी संपली का, कोणाला वरण भात चटणी कोशिंबीर पापड हे सुद्धा तीच बघायची, तिच्यासारखं प्रेमाने,आग्रहाने जेवायला वाढणं हे मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. होळीच्या दिवशी जवळजवळ शंभर शंभर पुरणपोळ्या ती सहज करत असे. माणसाच्या हृदयाकडचा रस्ता त्याच्या पोटामार्गे जातो हे तिला चांगलं ठाऊक होतं, म्हणून आज १६ वर्षानंतर सुद्धा असंख्य लोकांच्या मनात घर करून बसली आहे ती...आपल्या घरी आलेला कोणीही असो, उपाशीपोटी जाता कामा नये, हे तिने आयुष्यभर पाळलं. मग तो व्यक्ती कितीही वाजता येवो, रात्री अपरात्री सुद्धा पाहुण्याला जेऊ घालायची. माझे वडील तर पोलीस खात्यात होते. त्यांच्या कामाच्या वेळा फार विचित्र असायच्या. रात्री दोन अडीच तीन वाजता गरम गरम जेवण त्यांना वाढणं तिनं कधीच सोडलं नाही.

"नीलांबरी" चित्रपटानंतर माझा दुसरा मराठी चित्रपट "आई" होता. त्यामध्ये माझी जी भूमिका होती ती बायकोचं ऐकून आईला त्रास देणाऱ्या मुलाची होती. पिक्चर 50 आठवडे चालला पण मला तो माझ्या आईने बघू नये असंच वाटायचं. माझी आई गेल्यानंतर लगेचच मला मधुरा जसराज यांचा "आई तुझा आशिर्वाद" चित्रपटात काम मिळालं. त्यात माझं रोल खूप छान होतं. पण तो बघायला माझी आई नव्हती. नियतीचे खेळ आपल्या आकलनाच्या पलीकडचे असतात तेच खरं.


मिलिंद गवळींनी त्यांच्या आईसाठी लिहिलेल्या या भावनिक पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

Web Title: actor milind gawali shared emotional post for her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.