"बिग बॉस'मध्ये जिंकलेली कार मला अजून मिळाली नाही"; गौरव खन्नाने व्यक्त केली खंत; प्रणित म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 08:49 IST2026-01-05T08:48:01+5:302026-01-05T08:49:38+5:30
गौरव खन्नाने एका व्हिडीओत बिग बॉसमध्ये मिळालेल्या बक्षीसाबद्दल खुलासा केला. याशिवाय चाहत्यांना एक गुड न्यूज दिली

"बिग बॉस'मध्ये जिंकलेली कार मला अजून मिळाली नाही"; गौरव खन्नाने व्यक्त केली खंत; प्रणित म्हणतो...
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा महाविजेता ठरल्यानंतर अभिनेता गौरव खन्ना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच एका व्हिडीओत 'बिग बॉस १९' जिंकल्यावर गौरव खन्नाने एक खंत व्यक्त केली. गौरवने खुलासा केला की, एवढा मोठा शो जिंकूनही त्याला अद्याप बक्षीस म्हणून मिळणारी कार मिळालेली नाही. याच व्हिडीओत गौरवने तो आता थेट अंबानींचा शो होस्ट करणार असल्याचा खुलासा केलाय.
अंबानींच्या कार्यक्रमात गौरवची एन्ट्री
गौरव खन्ना म्हणाला, "मी पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम होस्ट करत आहे. हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. स्क्रिप्ट इतकी मोठी आहे की जणू काही मी एखाद्या परीक्षेची तयारीच करतोय असं वाटतंय. मी घोड्यावर स्वार होऊन स्टेजवर एन्ट्री करणार आहे. दोन शो होतील आणि प्रत्येक शोमध्ये सुमारे ४०,००० लोकांची गर्दी असेल. तिथली एनर्जी काही वेगळीच असेल. मी 'रिलायन्स फॅमिली शो' होस्ट करत आहे, जो दरवर्षी धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो.''
''ही संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. यापूर्वीही मला यासाठी बोलावण्यात आले होते, पण तेव्हा काही कारणास्तव जमून आले नव्हते. मात्र, यावर्षी हे शक्य झाले आहे. हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवला जाणार नाही, तरीही माझ्यासाठी ही एक मोठी संधी आहे."
यावेळी गौरव प्रणितला मिठाई देऊन त्याचं तोंड गोड करतो. तेव्हा प्रणित म्हणतो- ''मला मिठाई नको तू जिंकलेली कार हवी आहे.'' तेव्हा गौरव म्हणतो- ''ती कार मलाच अजून मिळाली नाहीये.'' गौरव असं म्हणताच प्रणित आणि तो दोघेही हसतात. एकूणच 'बिग बॉस १९' जिंकल्यावर थेट अंबानींच्या कार्यक्रमात बोलावणं येणं ही गौरवसाठी खूप मोठी गोष्ट आहे.