'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 25, 2025 13:44 IST2025-07-25T13:43:52+5:302025-07-25T13:44:23+5:30
'चला हवा येऊ द्या' का अपयशी झालं? दुसऱ्या कार्यक्रमाचा शोवर कसा परिणाम झाला, याविषयी भाऊ कदम यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय

'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.."
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. 'चला हवा येऊ द्या' शोमधील कलाकारांनाही खूप प्रसिद्धी मिळाली. पण काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. आता 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व सुरु होतंय. जुन्या पर्वातील निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे हे कलाकार आता दिसणार नाहीत. त्यानिमित्त भाऊ कदम यांची मुलाखत व्हायरल झालीय. या मुलाखतीत भाऊ कदम यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या अपयशावर मत व्यक्त केलं
'चला हवा येऊ द्या'च्या अपयशावर भाऊ कदम काय म्हणाले?
रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांना विचारण्यात आलं होतं की, 'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाचा तुमच्या आयुष्यावर परिणाम झाला का? यावर भाऊ कदम म्हणाले, "नाही तसं नाही झालं. मी याच्या पलीकडे विचार करतो की, जेव्हा असं घडतं त्यावेळी काय चालू आहे बाबा! आपण सातत्याने चित्रपट-नाटकाचं प्रमोशन करतोय. सतत एक माणूस एवढी वर्ष लिहितोय. त्याच्याबरोबर दुसराही कार्यक्रम चालू आहे, दुसऱ्या चॅनलला.. तोही कॉमेडी शोच सुरु आहे. पण त्या कार्यक्रमात लेखक वेगवेगळे आहेत."
"कधी त्या कार्यक्रमात अॅक्टरच लिहितोय. त्याच्यात इम्प्रोव्हाइस होतंय. त्यांच्याकडे वेरिएशन येतील पण आमच्याकडे एक माणूस लिहितोय त्यामुळे किती येणार? कदाचित असं होतं की, हे कधीतरी होणार. नाही TRP वर जात. ते छान झालं, आपलं नाही झालं. सगळंच असं होत नाही की, आपण हिटच देतोय. कुठली प्रक्रिया अशी झालीच नाही की, सगळेट हिट झालेत चित्रपट की सगळ्याच स्कीट वाजल्या, असं कधीच होत नाही ना! कुठेतरी अपयश ही यशाची पायरी आपण म्हणतो ना, खाली आलंच पाहिजे. तर परत पुन्हा वरती उठायला मजा येते."
पुढे 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांसोबत भेटणं होतं का? हे विचारलं असता भाऊ कदम म्हणाले, "आता सगळ्यांशी भेट होत नाही. फोनवर फक्त बोलणं होतं. कुशल असेल, श्रेया आहे, मग भारत कधीतरी फोन करतो. पण मीच आता इकडे अडकल्याने तशी भेट होत नाहीये. पण नाटकाला येतील माझ्या तेव्हा भेटतीलच."