"सुशांतने दिलेली 'ती' गोष्ट आजही माझ्याकडे आहे", अर्जुन बिजलानीने भावुक होत सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:07 IST2025-09-04T16:07:14+5:302025-09-04T16:07:47+5:30
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत मित्र अर्जुन बिजलानी भावुक

"सुशांतने दिलेली 'ती' गोष्ट आजही माझ्याकडे आहे", अर्जुन बिजलानीने भावुक होत सांगितली आठवण
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) लवकरच 'राइज अँड फॉल' शोमध्ये सहभागी होणार आहे. सोशल मीडियावरुन त्यानेच ही माहिती दिली आहे. अर्जुन टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अर्जुन बिजलानीची खूप चांगली मैत्री होती. नुकतंच अर्जुन बिजलानीने एका मुलाखतीत सुशांतची एक आठवण सांगितली.
अर्जुन बिजलानी आणि सुशांत एकाच इमारतीत राहायचे. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवायचे, मजा मस्ती करायचे. काही वर्षांनी सुशांतने घर बदललं. त्याच्या निधनाची बातमी मिळताच अर्जुन खूप रडला होता. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, "सुशांत माझा खूप चांगला मित्र होता. तो खूप प्रेमळही होता. त्याने जेव्हा पहिली बाईक घेतली होती तेव्हा मला फोन करुन घराखाली बोलवून घेतलं होतं. त्याला माहित होतं की मला बाईक्सची खूप आवड आहे. म्हणूनच त्याला मला बाईक दाखवायची होती."
तो पुढे म्हणाला, "सुशांत चांगला आर्टिस्ट होता. आपल्या कामात तो खूप लक्ष द्यायचा. माणूस म्हणूनही खूप चांगला होता. त्याच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा मी खूप रडलो. मला माहित नाही नक्की काय झालं होतं पण जे झालं ते व्हायला नको होतं."
"जेव्हा आम्ही एकाच इमारतीत राहायचो तेव्हा बरेचदा एकमेकांना भेटायचो. कधी माझ्या घरी तर कधी त्याच्या घरी टाईमपास करायचो. एकदा मी काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. सुशांतने मला सांगितलं होतं की त्याला काळ्या रंगाचा टीशर्ट आवडतो. यानंतर मी त्याला तो टीशर्ट दिला आणि सुशांतने केशरी रंगाची गंजी घातली होती ती त्याने मला दिली. आजही माझ्याकडे ती गंजी आहे",असंही अर्जुनने सांगितलं.