"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:43 IST2025-09-10T17:43:03+5:302025-09-10T17:43:29+5:30
अभिनेत्यानं कॉर्पोरेट आणि राजकारण क्षेत्रातील कामाची तुलना करत राजकर्त्यांवर ताशेरे ओढले.

"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला...
छोट्या पडद्यासह मोठा पडदा आणि रंगभूमी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आस्ताद हा सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय असतो. अनेक सामाजिक घटनांवर तो मोकळेपणाने बोलताना दिसतो. आताही आस्तादनं एक परखड पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या जोरदार चर्चेत आहे. कॉर्पोरेट आणि राजकारण क्षेत्रातील कामाची तुलना करत त्यानं राजकर्त्यांवर ताशेरे ओढले.
अस्ताद काळेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "कॉर्पोरेट असो, आय.टी असो, बँकिंग असो.... या सर्व क्षेत्रांमधे महिन्याला साधारण रु.२,५०,०००/- ते रु.४,५०,०००/- एवढा पगार मिळवणारे लोक हे मोठ्या पदांवर असतात, अधिकारी असतात. त्यांना तिथपर्यंत पोचायला बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्यांनी काही महिने जरी कामात टाळाटाळ केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर त्यांची नोकरी अथवा त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं. शिवाय सरकारी बँकेतले, कंपनीतले कर्मचारी/अधिकारी असाल तर ठराविक वयाचे झाल्यावर तुम्हाला निवृत्त व्हावंच लागतं".
मात्र, राजकारणातील परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानं पुढे लिहलं, "मात्र......!!!!! राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे, जिथे शिक्षणाची मूलभूत काहीही अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की पुढची ५ वर्ष तुमचा हा पगार, भत्ते वगैरे चालू असतं. दुसऱ्यांदा निवडून आलात की त्यात वाढही होते. आणि या ५ वर्षांमधे तुम्ही धड काम नाही केलंत, जबाबदाऱ्या पार नाही पाडल्यात, तरी तुमची हकालपट्टी होत नाही. आणि ही कामं, जबाबदाऱ्या या गावं, शहरं, राज्यं आणि देश चालवण्याशी निगडित आहे राव !!! आणि वयोमानपरत्वे निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी !!!!!" असे म्हणत त्यानं आपल्या पोस्टचा शेवट केला आहे. अस्ताद काळेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण त्यांच्या मताशी सहमत असल्याचे दिसत आहेत.