"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
By कोमल खांबे | Updated: September 7, 2025 14:54 IST2025-09-07T14:53:40+5:302025-09-07T14:54:39+5:30
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.

"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनोभावे १० दिवस बाप्पाची पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.
आदेश बांदेकर यांच्यासोबत अभिनेता विवेक सांगळेदेखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विवेकची फिरकी घेताना आदेश बांदेकर यांनी आपल्या लेकाच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला आहे. विवेक आणि आदेश बांदेकर यांची अभुदयनगरच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीत भेट झाली. आदेश बांदेकर यांनी विवेकला त्याच्या नव्या घराबद्दल विचारलं आणि फिरकी घेत ते म्हणाले, "यावर्षी एकटा आहे पुढच्या वर्षी तो जोडीने येणार आहे".
त्यानंतर ते म्हणाले "पुढच्या वर्षी मी सुद्धा सुनेला घेऊन विसर्जन मिरवणुकीला येणार आहे. गणपती बाप्पा मोरया". दरम्यान, आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकरचं नाव अभिनेत्री पूजा बिरारी हिच्याशी जोडलं जात आहे. याआधी सुचित्रा बांदेकर यांनीही मुलाखतीत लेकाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. पूजा बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीलाही दिसली होती. पण, अद्याप यावर पूजा किंवा सोहमने कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण, लवकरच बांदेकरांच्या घरी सनई चौघडे वाजणार असल्याचंही कन्फर्म झालं आहे.