'अ परफेक्ट मर्डर' नाटक रंगभूमीवर पुन्हा येतंय, प्रिया मराठेच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:22 IST2025-11-04T13:22:20+5:302025-11-04T13:22:50+5:30
प्रियाच्या जागी आता या नाटकात नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'अ परफेक्ट मर्डर' नाटक रंगभूमीवर पुन्हा येतंय, प्रिया मराठेच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री
अभिनेत्री प्रिया मराठेचं यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. ती कॅन्सरशी झुंज देत होती. प्रियाच्या अचानक निधनाने सर्वांना धक्का बसला. प्रियाने काही वर्षांपूर्वीच कॅन्सरवर मात केली होती. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत प्रिया शेवटची दिसली. मात्र पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढल्याने तिला मालिका अर्ध्यातच सोडावी लागली होती. मालिकेसोबत ती 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकातही काम करत होती. प्रियाच्या जागी आता या नाटकात नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
'अ परफेक्ट मर्डर' हे रंगभूमीवरील लोकप्रिय नाटक आहे. प्रियासोबत नाटकात अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री हे देखील होते. प्रियाच्या निधनानंतर आता या नाटकात अभिनेत्री दिप्ती भागवतची एन्ट्री झाली आहे. प्रियाच्या जागी ती दिसणार आहे. अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, दीप्ती भागवत, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री यांची नाटकात मुख्य भूमिका आहे. 'अ परफेक्ट मर्डर'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नीरज शिरवईकर यांनी नाटकाचं लेखन केलं असून विजय केंकरे यांनी दिग्दर्शन केलं आहे.
५ नोव्हेंबरपासून नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. रॉयल ओपेरा हाऊसमध्ये नाटकाचा शुभारंभ होणार आहे. दिप्ती भागवत या नाटकातून रंगभूमीवर येत आहे. नाटकात तिची मीरा ही भूमिका आहे. दीप्तीची मुलगी जुई भागवतही आता मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली आहे. 'गुलकंद','लाईक आणि सबस्क्राईब','झापुक झुपूक' या सिनेमांमध्ये ती दिसली होती.