मराठी रंगभूमीवर पुन्हा तेजोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:13 IST2025-10-19T12:13:28+5:302025-10-19T12:13:28+5:30
काळाचे संदर्भ बदलले असले, तरी सध्या मराठी रंगभूमीवर पुन्हा ‘क्लासिक’च्या दर्जाची नाटके आली आहेत. त्यामधील आशय खूप महत्त्वाचा आहे.

मराठी रंगभूमीवर पुन्हा तेजोत्सव
अजित भुरे, अभिनेते, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, प्रमुख कार्यवाह
नवीन लेखकांकडून नावीन्यपूर्ण काही लिहिले जात नसल्याने जुनी नाटके पुन्हा रंगभूमीवर येत आहेत असे आता म्हणणे चुकीचे ठरेल. कारण जुनी नाटके पुन्हा येत असली तरी उदयोन्मुख लेखक-दिग्दर्शकांची नवीन नाटकेही येत आहेत. या स्थितीमुळे खऱ्या अर्थाने हा मराठी रंगभूमीसाठी सुकाळ आहे. मनोरंजन विश्वाचा विचार केला तर नाटके सर्वांत चांगल्या प्रकारे सुरू आहेत. तीन-चार नवीन मुलांची नाटकेही आहेत आणि काही जुनी नाटकेही जोमात सुरू आहेत.
जुन्या नाटकांमध्ये आशय तोच असला तरी सादरीकरणाला खूप वाव असतो. ‘पुरुष’मध्ये शरद पोंक्षे किंवा ‘सखाराम बाईंडर’मध्ये सयाजी शिंदे आहेत. या कलाकारांचा अभिनय नाटकात पाहणे हे लोकांना हवेहवेसे असते. त्यामुळे ते जुने किंवा नव्याचा विचार करीत नाहीत. ते त्या कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी येतात. अशी नाटके करताना नाटक जरी जुने असले तरी काळाच्या कसोटीवर नव्याने करून पाहण्याची निर्माता-दिग्दर्शकाची उमेद असते.
‘सखाराम बाईंडर’सारखे नाटक जेव्हा नव्याने येते, तेव्हा त्या दिग्दर्शकाला कदाचित असे पाहायचे असते की काळ बदलला असला तरी परिस्थिती बदलली आहे का? ‘सखाराम बाईंडर’ला त्या काळी ज्या प्रकारचा विरोध झाला होता तसाच आता होतोय का? हे तपासून पाहायचे असते. कारण त्यातील विषय तोच आहे. याचा अर्थ ते जोखून पाहण्याची तयारी असल्याने जुनी नाटके येत आहेत.
दुसरीकडे नवीन नाटके येत नाहीत असे नाही. हृता दुर्गुळे आणि पुण्यातील ग्रुपचे नवीन नाटक येत आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे चंद्रकांत कुलकर्णीचे सादरीकरण असलेले नाटक येणार आहे. ‘वरवरचे वधूवर’ नाटकाला चांगला प्रतिसाद आहे. मार्केटचा विचार करता साधारण २० ते ४० वर्षे वय असलेल्या रसिकांचा एक ग्रुप आणि ३० ते ५० वर्षांचा दुसरा ग्रुप असे विभाजन केल्यास या दोन्हींना ज्या पद्धतीचे मनोरंजन आवडते त्या पद्धतीचे रसिक त्या नाटकांना येत आहेत.
चाळिशीतील रसिकांना जुनी नाटके पुन्हा बघायला आवडत आहेत. विशीतील प्रेक्षकही जुन्या नाटकांमध्ये काय होते, या कुतूहलापोटी गर्दी करत आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे.
मराठी नाटकाला नवीन प्रेक्षक येतोय ही चांगली गोष्ट आहे. जुन्या नाटकांच्या प्रतिसादामुळे नवीन प्रेक्षक जर रंगभूमीकडे वळला तर तो शुभशकुनच आहे.
‘पुरुष’सारख्या नाटकात रीमा लागू आणि नाना पाटेकरांनी उत्तम काम केले होते; पण आता पोंक्षेंच्या माध्यमातून नवीन रसिकांना तो विषय कळत असेल किंवा विविध प्रश्न पडून त्यांची सांस्कृतिक भूक भागत असेल तर ते खूपच महत्त्वाचे आहे. दुसरीकडे जुन्या प्रेक्षकांना ‘नॅास्टेल्जिया’चा आनंद मिळत आहे. तरुण प्रेक्षकवर्ग मराठी नाटकांबाबत आसुसलेला आहे. त्यांचे विषय, त्यांना आवडणारी भाषा आणि सादरीकण असेल तेव्हा तरुण प्रेक्षक येत आहेत.