मुंबई महापालिका निवडणूक लढवलेल्या पतीसाठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:10 IST2026-01-15T18:09:28+5:302026-01-15T18:10:50+5:30
"बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देणारी वृत्ती..." पती समाधान सरवणकरांसाठी तेजस्विनी लोणारीची पोस्ट

मुंबई महापालिका निवडणूक लढवलेल्या पतीसाठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट, म्हणाली...
Maharashtra BMC Election : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं आहे. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हायव्होल्टेज वॉर्डमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. समाधान सरवणकर हे लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचे पती आहेत. अलिकडेच अभिनेत्री आपल्या पतीच्या प्रचारासाठी वार्डात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आज मतदानाच्या दिवशी तेजस्विनीनं पती समाधान यांच्या कामाचा अभिमान व्यक्त करणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनीने समाधान सरवणकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. तिनं लिहलं, "बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देणारी वृत्ती, लोकांसाठी सातत्याने झटणारी निष्ठा आणि शांतपणे परिणाम साधणारा परिश्रम... लोकांसाठी अमर्याद मेहनत करणारा, खऱ्या अर्थाने People’s Person — समाधान सरवणकर! याच गोष्टींचा आज मनापासून अभिमान आहे". तिने या पोस्टमध्ये #कामबोलतं #निष्ठा #लोकांसाठीकाम #शांतपणेपरिणाम सारखे हॅशटॅग्स वापरलेत.
शिवसेनेतील फुटीमुळे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशा लढती चर्चेत आहेत. अशातच प्रभादेवी-दादर भागातील वॉर्ड क्रमांक १९४ मधील लढतीकडं सगळ्यांचं लक्ष आहे. या प्रभागात समाधान सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर याच प्रभागात सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार आहेत. या प्रभागात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. उद्या १६ जानेवरी रोजी निकाल लागणार आहे.