"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 22:30 IST2025-06-04T22:29:25+5:302025-06-04T22:30:22+5:30
कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. भाषावादात कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला.

"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
तामिळ सिनेमासह बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हासन त्यांच्या आगामी ठग लाइफ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी केलेल्या विधानावरून वादंग झाला. फिल्म प्रमोशनवेळी कन्नड भाषेबाबत कमल हासन यांनी केलेले विधान वादात सापडले. कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाल्याचं कमल हासन यांनी म्हटलं. हासन यांच्या या विधानावर बराच वाद उफाळला. कर्नाटकात कमल हासन यांचा जोरदार विरोध करण्यात आला.
कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. भाषावादात कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. आता चेन्नईत झालेल्या पत्रकार परिषदेतही कमल हासन आपल्या विधानावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्टपणे माफी मागणार नाही असं सांगत तामिळ अस्तित्वाचा उल्लेख केला. तामिळ माझे जीवन आहे, माझे अस्तित्व आहे असं कमल हासन यांनी म्हटलं.
कोर्टाने काय म्हटलं?
कर्नाटकउच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने अभिनेत्याला फटकारले आणि म्हटलं की, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण भावना दुखावण्याचा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकत नाही. आम्ही आता ते तुमच्यावर सोडत आहोत. जर तुम्ही कोणाला दुखावले असेल, तर माफी मागा. कर्नाटकातून करोडो कमवता येतात. जर तुम्हाला कन्नड लोकांची गरज नसेल, तर येथून कमवणे थांबवा अशा शब्दात न्यायालयाने त्यांना फटकारले. मात्र कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला.
ठग लाइफ करिअरमधील महत्त्वाचा टप्पा
कमल हासन यांनी पत्रकार परिषदेत भाषा वादावर फार बोलण्यास नकार दिला. तर ठग लाइफ सिनेमाबाबत अभिनेत्याने हा करिअरमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. कमल आणि मणिरत्नम यांचा ठग लाइफ सिनेमा ५ जूनला कर्नाटक वगळता देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यात कमल हासन यांच्यासोबत अभिनेत्री तृष्णा कृष्णन नजरेस येतील. बॉक्स ऑफिसवर कमल आणि मणिरत्नम यांच्या सिनेमाची टक्कर अक्षय कुमारच्या हाऊसफुल ५ शी होईल. हा मल्टिस्टारर सिनेमाही ५ जून रोजी रिलीज होत असून त्यात अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लीवर, चंकी पांडे, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, नरगिस फाखरी, डिनो मोरिया यासारखे कलाकार आहेत.