"बाबा इथे आहेत..."; धर्मेंद्र यांचं पोस्टर पाहताच सनी देओल भावुक, 'इक्कीस'च्या स्क्रीनिंगला काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:08 IST2025-12-30T16:01:40+5:302025-12-30T16:08:17+5:30
'इक्कीस' सिनेमाचं स्क्रीनिंग काल मुंबईत पार पडलं. यावेळी सनी देओलचा भावुक अंदाज सर्वांच्या नजरेत आला.

"बाबा इथे आहेत..."; धर्मेंद्र यांचं पोस्टर पाहताच सनी देओल भावुक, 'इक्कीस'च्या स्क्रीनिंगला काय घडलं?
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' (Ikkis) लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोमवारी मुंबईत या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपल्या वडिलांच्या आठवणीत अभिनेते सनी देओल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या वडिलांच्या पोस्टरकडे निर्देश करत त्याने पापाराझींना दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
धर्मेंद्र यांच्या आठवणीत सनी देओल भावुक
स्क्रीनिंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर सनी देओलने आपल्या वडिलांच्या 'इक्कीस' चित्रपटाच्या मोठ्या पोस्टरसमोर उभे राहून फोटो काढला. यावेळी धर्मेंद्र यांच्या पोस्टरकडे पाहताना त्याचे डोळे पाणावले होते. पापाराझींनी फोटो काढताच सनी देओलने धर्मेंद्र यांच्या पोस्टरकडे हात दाखवला आणि सांगितलं, "बाबा इथे आहेत''. या एका वाक्याने तिथे उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले. सनीच्या चेहऱ्यावर आनंद असला तरीही या क्षणी बाबा नाहीत, याची खंतही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.
या स्क्रीनिंगला सनी देओलसोबतच त्याचा भाऊ बॉबी देओल, वहिनी तान्या, पुतण्या आर्यमन आणि चुलत भाऊ अभय देओल उपस्थित होते. केवळ देओल परिवारच नाही, तर सलमान खान आणि रेखा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सलमान खान देखील धर्मेंद्र यांच्या पोस्टरकडे पाहून भावूक झाला होता. धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट असून यामध्ये ते ब्रिगेडियर एम. एल. खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत आहे.