काळाचा घाला! आवडत्या सुपरस्टारचा सिनेमा पाहायला गेला अन् मृत्यूने गाठलं, चिरंजीवीच्या चाहत्याचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:16 IST2026-01-13T18:14:16+5:302026-01-13T18:16:20+5:30
आवडत्या सुपरस्टारचा सिनेमा पाहायला गेला अन् चाहत्याचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण काय?

काळाचा घाला! आवडत्या सुपरस्टारचा सिनेमा पाहायला गेला अन् मृत्यूने गाठलं, चिरंजीवीच्या चाहत्याचा दुर्दैवी अंत
Mana Shankara Vara Prasad Garu Movie: हैदराबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. थिएटरमध्ये गेल्यानंतर अनेकदा टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाज ऐकायला येतो, मात्र, हैदराबादमधील कुकटपल्ली येथील एक चित्रपटगृहात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा 'मना संकरा वराप्रसाद गारू' या चित्रपटादरम्यान घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. हा सिनेमा पाहताना चिरंजीवी यांच्या चाहत्याचं निधन झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी, २०२६ रोजी घडली. कुकटपल्ली येथील अर्जुन थिएटरमधील या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होते. चिरंजीवीचा हा चाहता मनसोक्तपणे चित्रपट पाहण्याचा आनंद घेत होता, पण अचानक तो आपल्या सीटवरून खाली पडला.आवडत्या अभिनेत्याचा सिनेमा पाहायाला चाहता थिएटरमध्ये आला होता.पण त्याला कल्पनाही नव्हती की, हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरेल. पण या थिएटरमध्येच त्यानं अखेरचा श्वास घेतला.जवळच्या लोकांनी आणि थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवता आलं नाही.
दरम्यान, याची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी तपास सुरू केला. मात्र, यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, चिरंजीवीच्या चाहत्याच्या मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेने चित्रपटसृष्टी आणि चिरंजीवीच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.