Jana Nayagan Release Date: थलपती विजयचा अखेरचा सिनेमा कधी रिलीज होणार? न्यायालयाच्या निर्णयाकडे चाहत्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:17 IST2026-01-20T18:14:24+5:302026-01-20T18:17:08+5:30
थलपती विजयचा अखेरचा सिनेमा 'जन नायकन' कधी रिलीज होणार. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण एका क्लिकवर

Jana Nayagan Release Date: थलपती विजयचा अखेरचा सिनेमा कधी रिलीज होणार? न्यायालयाच्या निर्णयाकडे चाहत्यांचं लक्ष
तमिळ सुपरस्टार थलपथी विजयचा शेवटचा चित्रपट मानला जाणारा 'जन नायकन' (Jana Nayagan) सध्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राबाबत (CBFC Certification) मद्रास उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. विजयच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यानंतर तो पूर्णपणे राजकारणात सक्रिय होणार आहे.
नेमका वाद काय आहे?
'जन नायकन' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) चित्रपट प्रमाणित करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेत 'U/A' प्रमाणपत्र देण्यास नकार दिला किंवा काही मोठे बदल सुचवले. या निर्णयाविरुद्ध निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला एका खंडपीठाने निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला होता, ज्याला आता सेन्सॉर बोर्डाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मद्रास उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, चित्रपटातील काही भाग सामाजिक शांतता बिघडवू शकतात. आणि हे प्रसंग विशिष्ट हेतूला प्रेरणा देणारे आहेत. दुसरीकडे, निर्मात्यांच्या वकिलांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे सांगत चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
विजयचा शेवटचा चित्रपट आणि राजकारण
थलपथी विजयने अलीकडेच आपल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'जन नायकन' हा त्याच्या अभिनय कारकिर्दीतील ६९ वा आणि शेवटचा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनात होणारा विलंब विजयच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. जर निकाल निर्मात्यांच्या बाजूने लागला तर चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल, मात्र न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे ग्राह्य धरल्यास निर्मात्यांना चित्रपटात बदल करावे लागतील, ज्यामुळे प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडू शकते.