'पुष्पा 2' बघण्याच्या गडबडीत १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव, ट्रेनची धडक लागून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:11 IST2024-12-06T10:10:54+5:302024-12-06T10:11:51+5:30
'पुष्पा 2' बघण्याच्या गडबडीत रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय

'पुष्पा 2' बघण्याच्या गडबडीत १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव, ट्रेनची धडक लागून झाला मृत्यू
'पुष्पा 2'ची सध्या जबरदस्त क्रेझ आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या उत्कृष्ट अभिनयाने 'पुष्पा 2'ला चार चाँद लावले आहेत. हाच 'पुष्पा 2' पाहण्यासाठी प्रेक्षक पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला प्रचंड चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच 'पुष्पा 2' पाहण्याच्या गडबडीत आणखी एका मुलाचा मृत्यू ओढवला असल्याची घटना घडली आहे. काय घडलंय नेमकं?
'पुष्पा 2' पाहण्याच्या गडबडीत मुलाने गमावला जीव
पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार प्रवीण तामाचलम असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा आंध्रप्रदेश येथील श्रीकाकुलम येथील असून नोकरीसाठी बशेट्टीहल्ली येथे राहायचा. त्याने ITI डिप्लोमाचं शिक्षण घेतलं असून एका प्रायव्हेट कंपनीत काम करायचा. प्रवीण 'पुष्पा 2' पाहण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याने मित्रांसोबत हा सिनेमा पाहण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी दोन मित्रांसोबत 'पुष्पा 2' पाहायला जाताना रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रेनची धडक लागून प्रवीणचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रवीणच्या दोन मित्रांनी तिथून पळ काढला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. बशेट्टीहल्ली येथील वैभव थिएटरमध्ये सकाळी १० वाजता प्रवीण शो पाहायला जात होता. रेल्वे ट्रॅक ओलांडताना बाजूला ट्रेन येतेय हे प्रवीणने बघितलं नाही. त्यामुळे गडबडीत प्रवीणला आपला जीव गमवावा लागला. सध्या पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असून फरार झालेल्या दोन मित्रांचा शोध घेत आहेत. दरम्यान 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल केलाय.