VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:13 IST2026-01-09T19:02:04+5:302026-01-09T19:13:03+5:30
थिएटरमध्ये चक्क मगरी आणल्याने इतर प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली.

VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
Prabhas's The Raja Saab: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द राजा साब' आज प्रदर्शित झाला. प्रभासच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. प्रभासच्या यापूर्वीच्या चित्रपटांप्रमाणे यंदाही थिएटरमध्ये चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला. सध्या अशाच एका जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात प्रभासच्या चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये मगर आणल्याचे दिसते आहे.
थिएटरमध्ये ‘मगर’ घेऊन आले चाहते
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये प्रभासचे एक-दोन नव्हे, तर अनेक चाहते 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान थिएटरमध्ये ‘मगर’ घेऊन आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान त्यांनी ‘प्रभास की जय..’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. चाहत्यांच्या घोषणांनी संपूर्ण हॉल दणाणून गेला आहे. मात्र, हे दृश्य पाहून थिएटरमधील इतर प्रेक्षक घाबरून गेले.
व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या थिएटरमधील आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, तो दक्षिण भारतातील एखाद्या थिएटरमधील असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. थिएटरमधील हा अजब जल्लोषाचा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महत्वाचे म्हणजे, चाहत्यांनी आणलेल्या ‘मगरी’ खऱ्या नसून, नकली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘द राजा साब’मधील सीनमुळे फॅन्स झाले वेडे
चाहत्यांनी थिएटरमध्ये मगर का आणली? यामागचे कारणही समोर आले आहे. ‘द राजा साब’ चित्रपटातील एका दृश्यात प्रभास चक्क मगरीसोदत लढाई करतो. हाच सीन पाहून चाहते इतके भारावून गेले की, त्यांनी तो क्षण प्रत्यक्ष थिएटरमध्ये साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
चित्रपट प्रदर्शित
प्रभासचा ‘द राजा साब’ आज, 9 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभाससोबत मालविका मोहन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती याने केले आहे.