'दृश्यम', 'अंधाधून'पेक्षाही खतरनाक थ्रिलर-सस्पेन्स, सिनेमाचा अनपेक्षित शेवट पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:00 IST2026-02-04T14:00:08+5:302026-02-04T14:00:58+5:30
सिनेमातला प्रत्येक सीन अस्वस्थ करणारा आणि खिळवून ठेवणारा आहे

'दृश्यम', 'अंधाधून'पेक्षाही खतरनाक थ्रिलर-सस्पेन्स, सिनेमाचा अनपेक्षित शेवट पाहून चक्रावून जाल
आजकाल अनेकांना सस्पेन्स-थ्रिलर सिनेमे पाहायला आवडतात. हिंदीत 'दृश्यम','अंधाधुन' या सिनेमांनी तर प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. सतत घडणाऱ्या घडामोडी आणि अनपेक्षित क्लायमॅक्स यामुळे या सिनेमांचा वेगळा चाहतावर्ग बनला. पण एक असा सिनेमा आहे जो 'दृश्यम'लाही मागे टाकतो. २ तास १९ मिनिटांच्या या सिनेमातला प्रत्येक सीन अस्वस्थ करणारा आणि खिळवून ठेवणारा आहे. कोणता आहे हा सिनेमा?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने नेहमीच आपल्या आशयघन कथांनी प्रेक्षकांना थक्क केले आहे. असाच एक मास्टरपीस तमिळ चित्रपट म्हणजे 'चित्था'. लहान मुलींचं अपहरण आणि त्यांच्यावर अत्याचार या घटनांमागील नराधम कोण? यावर ही कथा थरार, इमोशन्स आणि दहशतीने भरलेली आहे.
नेमकी गोष्ट काय आहे?
चित्रपटाची कथा 'सुंदरी' नावाच्या एका ५-६ वर्षांच्या मुलीभोवती फिरते. सुंदरी तिच्या आईसोबत आणि लाडक्या काकांसोबत (सिद्धार्थ) राहत असते. या हसत्या खेळत्या कुटुंबात एक वादळ येतं. अचानक सुंदरीच्या शाळेतील एका मैत्रिणीवर अत्याचार होतो आणि संशयाची सुई तिच्या काकांकडे वळते. याच गोंधळात एके दिवशी सुंदरीचेही अपहरण होते. आपल्या पुतणीला वाचवण्यासाठी आणि खरा गुन्हेगार शोधण्यासाठी एक सामान्य माणूस व्यवस्थेशी आणि त्या हैवानाशी कसा लढतो याची ही काळजाचा ठोका चुकवणारी कथा आहे.
सिद्धार्थचा दमदार अभिनय आणि राष्ट्रीय स्तरावर कौतुक
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ याने मुख्य भूमिका साकारली असून त्यानेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. सिद्धार्थचा अभिनय इतका वास्तववादी आहे की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते. त्याच्यासोबत निमिषा सजयन हिनेही उत्तम काम केले आहे. दिग्दर्शक एस. यू. अरुण कुमार यांनी प्रत्येक फ्रेमवर अतिशय बारकाईने काम केले आहे. मूळ तमिळ असलेला हा चित्रपट ओटीटीवर हॉटस्टारवर उपलब्ध आहे.