१४ किलो सोनं चलाखीने लपवलं अन्...; 'त्या' प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा नाहीच! नेमकं काय झालेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:49 IST2025-07-18T11:41:39+5:302025-07-18T11:49:49+5:30
सोनं तस्करी प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला दिलासा नाहीच! कोर्टाने जामीनही नाकारला

१४ किलो सोनं चलाखीने लपवलं अन्...; 'त्या' प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा नाहीच! नेमकं काय झालेलं?
Actress Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला काही महिन्यांपूर्वी बंगळुरू विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल १२.५६ कोटींपेक्षा जास्त होती. त्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली, तिची चौकशी सुरू होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या सोनं तस्करी प्रकरणी न्यायालयाने तिला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला या कालावधीत जामीन मिळणार नाही.
रान्याने २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत एकूण ५२ वेळा दुबईला प्रवास केला होता. दुबईला वारंवार भेटी दिल्याने ती अधिकाऱ्यांच्या रडारखाली होती. गेल्या वर्षी तिने ३० वेळा दुबईला प्रवास केला होता आणि १५ दिवसांत चार वेळा प्रत्येक वेळी किलो सोने घेऊन परतली. त्यावेळी बंगळुरू विमानतळावर अधिकाऱ्यांनी रान्याला अटक केली होती.
या तपासादरम्यान रान्या रावने सोनं चलाखीने तिच्या शरीरावर परिधान केलं होतं. तसेच तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बारही लपवल्याचं आढळलं. या कारवाईनंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी रान्याच्या लावेल रोड येथील घरावर छापा टाकला, जिथे ती तिच्या पतीसोबत राहत होती. छाप्यादरम्यान अभिनेत्रीच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं होतं.
कोण आहे रान्या राव?
३१ वर्षीय रान्या ही कर्नाटकातील चिकमंगलूरची रहिवासी आहे. तिने बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण तिला चित्रपटसृष्टीत रस होता. म्हणूनच तिने किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. रान्या रावने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप यांनी केलं होतं, ज्यांनी स्वतः त्यात मुख्य भूमिका साकारली होती.