"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:31 IST2025-05-05T11:28:16+5:302025-05-05T11:31:25+5:30
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'अबीर गुलाल' चित्रपटाला खूप विरोध होत आहे.

"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...
Prakash Raj Supports Abir Gulaal: जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देभभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'अबीर गुलाल' चित्रपटाला खूप विरोध होत आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भाष्य केलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींवर भारतात बंदी घालण्यात आली. शिवाय अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील बॅन करण्यात आले आहेत. या प्रकरणी प्रकाश राज यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. त्यादरम्यान या मुलाखतीमध्ये प्रकाश राज म्हणाले- "मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नाही. मग तो चित्रपट कोणत्याही विचारसणीचा असो. याबद्दल लोकांना ठरवू द्या. लोकांना अधिकार आहेत. तुम्ही अचानक चित्रपटांवर बंदी घालू शकत नाही. पण, एका प्रोसेस म्हणून चित्रपट प्रदर्शित होणं गरजेचं आहे."
त्यानंतर दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत' आणि 'पठाण' चित्रपटाचं उदाहरण देत प्रकाश राज यांनी सांगितलं, "आजकाल कोणत्याही गोष्टीमुळे लोकं दुखावली जाऊ शकतात. पद्मावतच्या प्रदर्शनापूर्वी दीपिका पादुकोणला सुद्धा धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या दरम्यान बेशरम रंग गाण्याचा विरोध करण्यात आला होता. कारण त्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली होती."
प्रशासनावर व्यक्त केली नाराजी
'अबीर गुलाल' चित्रपटाच्या बंदीवर बोलताना ते म्हणाले- "सरकार या गोष्टींसाठी पाठिंबा देत आहे, कारण समाजात एक भीती निर्माण व्हावी. त्यामुळे या देशात काही चित्रपट बनत नाहीत आणि ते बनवू देणार नाहीत कारण तिथे सेन्सॉरशिप आहे. पूर्वी राज्यात सेन्सॉरशिप होती. आता, त्यांनी ते अधिकार केंद्रीय सेन्सॉरशिपकडे सोपवले आहेत. त्यामुळे काय बनवायचं आणि कसं बनवायचं याबद्दल आता ते ठरवतात. त्यामुळे मला असं वाटतं फिल्म इंडस्ट्री ही एक अतिशय असुरक्षित इंडस्ट्री आहे. असं म्हणत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, 'अबीर गुलाल' सिनेमा येत्या ९मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. या सिनेमातफवाद खान आणि वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.