धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:23 IST2025-10-28T14:21:14+5:302025-10-28T14:23:57+5:30
सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने चेन्नईत मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तपास केल्यावर काय घडलं?

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
तामिळनाडूमध्ये सोमवारी (२७ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी एका ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी अभिनेते रजनीकांत (Rajinikanth), अभिनेता धनुष आणि तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती. ही धमकी तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली होती. नेमकं प्रकरण काय?
धमकीचा ईमेल मिळताच सोमवारी सायंकाळी तेयनाम्पेट पोलीस बॉम्ब शोधक रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानी तातडीने तपासणीसाठी पोहोचले. अभिनेत्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कोणतीही अनोळखी व्यक्ती घरात बॉम्ब ठेवण्यासाठी आली नसल्याची माहिती दिली, त्यामुळे ही धमकी खोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
त्यानंतर, पोलीसांकडून अभिनेता धनुष आणि टीएनसीसी अध्यक्ष सेल्वपेरुंथगई यांच्या घरांची देखील कसून तपासणी केली. या सखोल तपासणीनंतर, पोलिसांना या तिन्ही ठिकाणी कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही आणि ही धमकी अफवा असल्याचं अधिकृतपणे घोषित करण्यात आलं.
चेन्नई शहरात गेल्या अनेक आठवड्यांपासून हाय-प्रोफाइल व्यक्ती आणि महत्त्वाच्या ठिकाणांना अशा खोट्या बॉम्ब धमक्या मिळण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. यापूर्वी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानासह, मुख्यमंत्री आणि अन्य कलाकारांनाही अशाच बनावट धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. धमकी देणाऱ्या ईमेलचं मूळ शोधून काढण्यासाठी आणि या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सध्या चेन्नई पोलीस करत आहेत.