राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? चाहत्यांची उत्सुकता वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 18:58 IST2026-03-22T18:57:58+5:302026-03-22T18:58:34+5:30
मराठमोळी अभिनेत्री 'पेड्डी'मध्ये एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? चाहत्यांची उत्सुकता वाढली!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'ग्लोबल स्टार' राम चरण याचा आगामी चित्रपट 'पेड्डी' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. यातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची यात एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूडसह दक्षिणेतही आपली ओळख निर्माण करणारी सुंदर मराठमोळी अभिनेत्री 'पेड्डी'मध्ये एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.
तर ती अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर. दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या या 'स्पोर्ट्स ड्रामा' चित्रपटात मृणाल ठाकूर एक 'गेस्ट अपिअरन्स' करणार असल्याची चर्चा आहे. 'पिंकविला'च्या वृत्तानुसार, मृणाल केवळ चित्रपटात दिसणार नाही, तर ती राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत एका 'डान्स नंबर'मध्ये थिरकताना दिसेल. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
'पेड्डी' हा केवळ एक स्पोर्ट्स ड्रामा नसून तो 'स्पोर्ट्स ड्रामा-क्राईम थ्रिलर' प्रकारातील चित्रपट आहे. यामध्ये राम चरण एका क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा आणि रामचा नवीन लूक यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मृणाल ठाकूरच्या एन्ट्रीमुळे या चित्रपटाच्या ग्लॅमरमध्ये अधिकच भर पडली आहे.
कधी होणार प्रदर्शित?
मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'डकैत: एक प्रेम कथा' आणि 'जवानी तो इश्क होना है' या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, 'पेड्डी'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.