'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:59 IST2024-12-16T12:58:16+5:302024-12-16T12:59:12+5:30
Pushpa 2 Box Office : अटकेनंतर 'पुष्पा २'ची डबल कमाई, पाहा सिनेमाचं वीकेंड कलेक्शन

'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे
Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २' धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे शुक्रवारी(१४ डिसेंबर) अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक केली होती. त्यानंतर अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर आणि संपूर्ण रात्र तुरुंगात काढल्यानंतर शनिवारी सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली.
पण, अल्लू अर्जुन तुरुंगात असतानादेखील बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २' सुसाट असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचं दिसलं. शनिवारी आणि रविवारी 'पुष्पा २'चं कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत दुप्पटीने वाढल्याचं पाहायला मिळालं. अल्लू अर्जुनच्य अटकेनंतर 'पुष्पा २'च्या वीकेंड कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, वीकेंड कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
ज्या दिवशी अल्लू अर्जुनला अटक झाली त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 'पुष्पा २'ने ३६.४ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर मात्र शनिवारी सिनेमाने तब्बल ६३.३ कोटींचा गल्ला जमवला. तर रविवारी तब्बल ७५ कोटींची कमाई केली. तर आत्तापर्यंत या सिनेमाने देशभरात ९०० कोटींचा आकडा गाठला आहे.
'पुष्पा २' हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राईज' या सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'पुष्पा २'नंतर आता 'पुष्पा ३'ची घोषणाही करण्यात आली आहे. आता चाहते 'पुष्पा ३'च्या प्रतिक्षेत आहेत.