प्रसिद्ध गायक अभिजीत यांचं निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:14 IST2026-01-25T12:12:14+5:302026-01-25T12:14:52+5:30
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत मजुमदार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे अभिजीत यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

प्रसिद्ध गायक अभिजीत यांचं निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि संगीत दिग्दर्शक आणि गायक अभिजीत मजुमदार यांचे आज रविवारी, २५ जानेवारी रोजी निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने ओडिया मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
अभिजीत मजुमदार हे गेल्या काही महिन्यांपासून यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होते. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्स भुवनेश्वर येथे उपचार सुरू होते. काही काळ ते गंभीर अवस्थेत कोमामध्ये होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
Our sincere obeisance to legendary music director and composer Abhijit Majumdar. It is a huge loss for Odisha, and even more so for the music world.#AbhijitMajumdar#GemOfOdisha#MusicHasNoBorders#AColossalLoss#TalentParExcellencepic.twitter.com/Abz0H3cKOO
— Dr Lenin Mohanty (@DrLeninMohanty1) January 25, 2026
ओडिया सिनेसृष्टीतील योगदान
अभिजित मजुमदार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट ओडिया चित्रपटांची निर्मिती केली. केवळ निर्मितीच नाही, तर संगीत दिग्दर्शन, गायन आणि अभिनयातही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. 'रॉकस्टार', 'लोफर', आणि 'चॉकलेट' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी दिलेले संगीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी ओडिया प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.
अभिजीत मजुमदार यांच्या निधनाची बातमी समजताच ओडिया चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "एक अष्टपैलू कलाकार आणि एक चांगल्या स्वभावाचा माणूस आपण गमावला आहे," अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी भुवनेश्वर येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे समजते.