दारु पाजली, प्रायव्हेट व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप, पोलिसांकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:14 IST2025-10-09T11:08:41+5:302025-10-09T11:14:54+5:30
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यावर अभिनेत्रीचे गंभीर, पोलिसांकडून कारवाई, नेमकं प्रकरण काय?

दारु पाजली, प्रायव्हेट व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप, पोलिसांकडून कारवाई
अभिनयाच्या ग्लॅमरस दुनियेत येऊन नाव, पैसा प्रसिद्धी कमावण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण-तरुणी या क्षेत्रात येत असतात. मात्र,हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांना चांगले वाईट अनुभव येतात. विशेष म्हणजे मुलींच्या वाट्याला असे अनेक अनुभव येत असतात. काही मुली वाईट प्रसंगाच्या बळी ठरतात. काही जण यावर आवाज उठवतात तर काही जण भीतीपोटी गप्प राहतात. मनोरंजनविश्वातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने प्रसिद्ध चित्रपट निर्माते हेमंत कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.
दरम्यान, या तक्रारीवरून बेंगळुरू पोलिसांनी हेमंत कुमार यांना अटक केली आहे. अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक छळ, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, निर्मात्याने या टीव्ही अभिनेत्रीला त्याच्या रीजी नावाच्या एका चित्रपट लीड रोल ऑफर केला होता. या प्रोजेक्ट संबंधिक कागदोपत्री व्यवहार देखील झाला होता. शिवाय अभिनेत्रीला सायनिंग अमाउंट म्हणून २ लाख रुपये देण्याची शाश्वती देखील निर्मात्याने दिल्याची सांगितली जाते. मात्र, तिला ६० हजार रुपये देण्यात आले.
अभिनेत्रीचे फिल्ममेकरवर धक्कादायक आरोप...
चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत असल्याने अभिनेत्री प्रचंड नाराज झाली होती. याचाच फायदा घेत निर्मात्याने तिच्याकडे विचित्र मागणी करायला घेतली. त्याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की,त्याने जाणूनबुजून चित्रपटाचं शूटिंग उशिरा सुरु करण्याचं ठरवलं. शिवाय चित्रपटात शॉर्ट कपडे घालण्यासाठी आणि अश्लील सीन करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, तिने या सगळ्याला विरोध केल्यानंतर निर्मात्याने तिला शिवीगाळ केली आणि धमक्याही दिल्या.हे तिच्यासाठी फार धक्कादायक होतं.
अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान, हेमंतने तिच्या पेयामध्ये दारु मिसळली आणि तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला, असा दावाही तिने केला.त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा या निर्मात्याने त्याच्या गुंडांचा वापर करून अभिनेत्री आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे.या आरोपांच्या आधारे, बेंगळुरूमधील राजाजीनगर पोलिसांनी हेमंत कुमारला तात्काळ ताब्यात घेतले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.