अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील एका दिवसाची झलक, असा आहे 'पुष्पा 2' चा सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:10 IST2023-08-30T13:32:33+5:302023-08-30T14:10:30+5:30
इंस्टाग्रामने आपल्या अधिकृत हँडलवरून सुपरस्टार अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला.

Allu Arjun
पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन सध्या यशाच्या शिखरावर आहे. साऊथ इंडस्ट्री असो की हिंदी, सुपरस्टार अल्लू अर्जुनची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात अल्लू अर्जुनने आपला डंका वाजवला आहे. मागील एका वर्षापासून अभिनेता अल्लू अर्जुन हा पुष्पा 2 साठी चर्चेत आहे. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने अल्लू अर्जुनच्या घरी आणि पुष्पा 2 च्या सेटला भेट दिली.
इंस्टाग्रामने आपल्या अधिकृत हँडलवरून सुपरस्टार अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील एक दिवसची झलक पाहायला मिळत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला अल्लू अर्जुन म्हणतो, "हाय इंस्टाग्राम, नमस्ते. हैदराबाद, भारतात तुमचे स्वागत. आज मी तुम्हाला पुष्पा 2 : द रुलच्या सेटवर घेऊन जाणार आहे. त्यापुर्वी मी तुम्हाला घरातील माझे आवडते ठिकाण दाखवतो. माझी सकाळ मी शक्य तेवढ्या नैसर्गिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. घरातील बाग मी माझ्यासाठी खास आहे". यानंतर अभिनेता कॉफी घेतो. व्हिडिओ पुढे चाहत्यांना हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये जाताना पाहायाला मिळतो.
अल्लू अर्जुन पुढे म्हणतो की, "मी घरी रोज फोन करतो. ते माझ्या केंद्रस्थानी आहेत. रामोजी फिल्म सिटी ही जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओपैकी एक आहे". यानंतर तो चाहत्यांना भेटतो. व्हिडिओमध्ये चाहत्यांना पुष्पा 2 च्या सेटची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पंसती दर्शवली आहे.
पुष्पा 2च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, फहद फाजील हा चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. पुष्पा 2चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. रिपोर्टनुसार, पुष्पा द रुल 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होऊ शकते. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.