दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:35 IST2025-10-03T16:14:52+5:302025-10-03T16:35:26+5:30
कोणता आहे तो सिनेमा?

दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री?
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादुकोण चर्चेत होती. आई झाल्यानंतर तिला २ सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तिने केलेल्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे आणि इतर काही अटींवरुन तिला सिनेमातून काढण्यात आलं. तर आता आलिया भटला एका साउथ सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिच्याजागी अभिनेत्री साई पल्लवीची निवड करण्यात आली आहे. कोणता आहे तो सिनेमा?
फिल्ममेकर नाग अश्विन यांची फिमेल सेंट्रिक सिनेमात आलिया भट दिसणार अशी बातमी गेल्या वर्षीच आली होती. आलियासोबत त्यांची चर्चाही झाली होती. मात्र या गोष्टीला आता ११ महिने झाले. नाग अश्विन यांच्याच 'कल्कि २' सिनेमातून दीपिका पादुकोणला काढण्यात आलं. 'कल्कि २'साठी सध्या कास्टिंगचा विचार होत असल्याने नाग अश्विन यांनी मध्ये आपल्या फीमेल सेंट्रिक सिनेमावर लक्ष द्यायचं ठरवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार आलिया भटने मार्च २०२६ च्या अनेक तारखा मॅडॉक फिल्म्सला दिल्या आहेत. त्यांच्या 'चामुंडा' सिनेमात ती दिसणार आहे. यामुळेच आता नाग अश्विन यांनी साई पल्लवीसोबत बोलणी सुरु केली आहेत. अॅक्शन ड्रामा सिनेमांसाठी साई पल्लवी त्यांची कायमच आवडती अभिनेत्री राहिली आहे.
तर दुसरीकडे साई पल्लवी सध्या 'रामायण' सिनेमात व्यग्र आहे. तिने संपूर्ण वेळ नितेश तिवारींच्या या सिनेमाला दिला आहे. सिनेमाच्या दुसऱ्या भागाचंही तिचं शूट लवकरच पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. यानंतर ती नाग अश्विन यांच्या सिनेमाचं काम पुढील वर्षात करु शकते.