"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:45 IST2025-11-11T12:44:00+5:302025-11-11T12:45:52+5:30
२०२१ साली सिद्धार्थचं अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. यानंतर शहनाज अक्षरश: कोसळली. नुकतंच ती सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झाली आहे.

"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
अभिनेत्री शहनाज गिलचा 'इक कुडी' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. यातील शहनाजच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. शहनाज गिल 'बिग बॉस १३'मुळे लोकप्रिय झाली होती. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि तिची जोडी खूप गाजली होती. दोघं एकमेकांच्या प्रेमातही पडले होते. 'सिडनाज'असं त्यांना त्यांच्या फॅन क्लबने नाव दिलं होतं. २०२१ साली सिद्धार्थचं अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. यानंतर शहनाज अक्षरश: कोसळली. नुकतंच ती सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झाली आहे.
शहनाज गिलने रणवीर अहालाबादियाला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धार्थच्या निधनानंतर मी आणखी समजूतदार झाले असंही ती सांगते. शहनाज म्हणाली, "सिद्धार्थ मला समजूतदारपणा देऊन गेला आहे. जेव्हा ती घटना घडली त्यानंतर मी जास्त समजूतदार झाले आहे. नाहीतर मी बिग बॉसमध्ये होते तशीच जगाची किंवा कोणाचीच पर्वा न करणारी तशी असते. तुम्ही बिग बॉसमध्ये जी शहनाज पाहिलीत तिने आयुष्यात खूप संघर्ष केला. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर मी जे गमावलं त्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. मी खूप वेंधळी, भावनावश आणि मस्तमौला होते. पण सिद्धार्थनंतर माझ्यातली निरागसताच बदलली."
बिग बॉसचे जुने रील्स आज इन्स्टाग्रामवर पाहून काय वाटतं? यावर शहनाज म्हणाली, 'कधी कधी मी ते रील्स बघते आणि विचार करते की कशी होते मी? अशी...आयुष्याने मला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. ती मुलगी वेगळीच होती.. सहज आणि हसमुख होती. आयुष्य आपोआप बददलं, माझ्या भावानेही माझ्यात बरेच बदल केले."
सिद्धार्थची आणखी एक आठवण सांगत शहनाज म्हणाली, "मी तर चंदीगढला परत जाणार होते. पण सिद्धार्थने मला थांबवलं होतं. सिद्धार्थने माझ्यासाठी इथे सगळी व्यवस्था केली. मला त्यावेळी मुंबई शहराबद्दल काहीही माहित नव्हतं. मी स्वत:वर काम केलं, स्वत:कडे लक्ष दिलं आणि करिअरची शून्यापासून सुरुवात केली."