शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:41 IST2025-12-05T18:40:06+5:302025-12-05T18:41:19+5:30
सुहानानं शेअर केलेल्या एका स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली...
बॉलिवूडच्या 'किंग' शाहरुख खानची लेक सुहाना खान कायम चर्चेत असते. 'द आर्चिज' सिनेमातून सुहानाने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. सुहानाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. सुहाना सोशल मीडियावर सक्रीय असून त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच सुहानानं शेअर केलेल्या एका स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे.
सुहाना खान हिचं नाव सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत जोडलं जात. 'द आर्चिज' सिनेमात दोघे एकत्र झळकले होते. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. तेव्हापासून सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या अफेअरची चर्चा रंगलेल्या आहेत. आता सुहाना खाननं रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा याच्यासाठी खास स्टोरी शेअर केली. अगस्त्य नंदाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इक्कीस' येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच त्यांचे पहिले गाणे "सितारे" रिलीज केले होते. ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सुहाना खाननं हे 'सितारे' गाणे तिच्या सोशल मीडिया स्टोरीजवर शेअर करून चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, 'इक्कीस' या चित्रपटातून परमवीर चक्र विजेते सर्वात तरुण अधिकारी अरुण खेत्रपाल यांची सत्यकथा पडद्यावर येणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजान प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. अगस्त्य नंदा शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर चित्रपटात जयदीप अहलावत यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
कोण होते अरुण खेत्रपाल?
अरुण खेत्रपाल यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आले होते. ते एक टँक कमांडर होते आणि त्यांच्या शौर्यासाठी ते ओळखले जातात, कारण युद्धादरम्यान त्यांनी एकट्याने शत्रूचे १० टँक उद्ध्वस्त केले होते. अरुण खेत्रपाल यांना देशाचे सर्वात तरुण वीर म्हणून ओळखले जाते. अवघ्या २१ वर्षांच्या तरुण वयात ते शहीद झाले.