"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:45 IST2025-01-17T08:39:03+5:302025-01-17T08:45:05+5:30
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम त्याच्या घरातील काम करणाऱ्या महिलेने सांगितला आहे.

"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली आहे. सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा शोध अद्याप लागलेला नाही. हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी २० पथके तयार केली आहेत. सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पथकाला वेगवेगळे काम देण्यात आले आहेत. दरम्यान, हा हल्लेखोर सैफच्या घरात नेमका शिरला कसा याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. मुंबई पोलिसांकडून सैफच्या घरातील सदस्यांची आणि काम करणाऱ्यांकडून पोलीस सध्या माहिती घेत आहेत. अशातच सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांनी हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला आहे.
बुधवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात एक घुसखोर घुसला होता. हल्लेखोर सैफ अली खान आणि करीना कपूरचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत गेला, जिथे एका मोलकरणीने त्याला पाहिले. घरातील मोलकरणीने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही हातात शस्त्रे असलेल्या हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला. हा गोंधळ ऐकून सैफ अली खान आणि करीना कपूर त्या खोलीत धावत आले. त्यावेळी हल्लेखोराला पकडताना सैफ जखमी झाला.
पोलिस तक्रारीनुसार, घरातील नोकर एलियामा फिलिप यांनी घुसखोराला पहिल्यांदा पाहिले होते. फिलिप यांनी पहाटे झालेल्या भयानक हल्ल्याची सविस्तर माहिती दिली.
"१५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मी सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीर उर्फ जयबाबा याला जेवू घातले आणि झोपवले. त्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्याने रात्री झोपण्याची व्यवस्था केली. पहाटे २ वाजता, मला आवाजाने जाग आली आणि मी सरळ उठून बसले. बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला. मला वाटलं करिना मॅडम जेह बाबांना भेटायला आल्या असतील. त्यामुळे काहीही न विचारता मी झोपलो, पण मनात अस्वस्थता होती. त्यामुळे मी बाथरूममध्ये कोण आहे हे तपासण्यासाठी मी उठल तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर आली आणि जेह बाबाच्या बेडकडे गेली. घाबरून मी पटकन जेह बाबकडे गेले. त्यानंतर हल्लेखोराने माझ्याकडे इशारा करून "कोई आवाज नही" असे म्हटले. त्याच क्षणी जेह बाबाची आया जुनू देखील जागी झाली. त्या माणसाने तिलाही आवाज करू नकोस असे बजावले. तो डाव्या हातात काठी आणि उजव्या हातात एक लांब, पातळ ब्लेडसारखी वस्तू धरून होता," असं एलियामा फिलिप यांनी म्हटलं.
"मी जेह बाबाला वाचवण्याच्या प्रयत्न केला तेव्हा त्या माणसाने माझ्यावर ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे माझे दोन्ही हात जखमी झाले. मी त्याला विचारले, "तुला काय हवे आहे? तुला किती पैसे हवे आहेत?. तो म्हणाला, १ कोटी रुपये. हा गोंधळ ऐकून करीना मॅडम धावत खोलीत आल्या. सैफ सरांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तुला काय हवे आहे. त्यानंतर त्या माणसाने लाकडी वस्तू आणि ब्लेडने सैफ सरांवर हल्ला केला. त्यावेळी आत गेलेली दुसरी नर्स गीता हिच्यावरही त्या माणसाने हल्ला केला. आम्ही खोलीतून बाहेर पडून दार लावून वरच्या मजल्यावर पळून जाण्यात यशस्वी झालो. आवाजाने घरातील इतर कर्मचारी जागे झाले आणि आम्ही सर्वजण खोलीत गेलो. पण, जेव्हा आम्ही खोलीत परतलो तेव्हा तो माणूस कुठेच दिसला नाही," असंही एलियामा फिलिप यांनी सांगितले.
या घटनेत सैफ अली खानच्या मानेला, उजव्या खांद्यावर, पाठीला, डाव्या मनगटाला आणि कोपराला दुखापत झाली होती. तर गीताच्या उजव्या मनगटाला, पाठीला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती.