उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

By ऋचा वझे | Updated: September 12, 2025 10:33 IST2025-09-12T10:32:05+5:302025-09-12T10:33:32+5:30

'बिन लग्नाची गोष्ट' लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे जाऊन नात्यांवर बोलणारा सिनेमा आहे. उमेश-प्रियाची जोडी एकत्र तर आली पण... वाचा सविस्तर रिव्ह्यू

Umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta marathi movie review | उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Release Date: September 12,2025Language: मराठी
Cast: उमेश कामत, प्रिया बापट, गिरीश ओक, निवेदिता सराफ, संजय मोने, सुकन्या मोने
Producer: नितीन वैद्यDirector: आदित्य इंगळे
Duration: २ तास १४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

'बिन लग्नाची गोष्ट' म्हणजे काय? तर लिव्ह इन रिलेशनशिप असेल असाच अर्थ निघतो. प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतचा (Umesh Kamat) हा सिनेमा लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहेच पण यामधून एक वेगळा संदेश देण्यात आला आहे. 

कथानक -  लंडनमध्ये स्थायिक झालेल्या ऋतिका(प्रिया बापट) आणि आशयची (उमेश कामत) ही कहाणी आहे. सिनेमाची सुरुवातच ऋतिका आठ महिन्यांची गरोदर असल्यापासून होते. ऋतिका आणि आशय या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे पण ऋतिका लग्नसंस्थेच्या विरोधात असते. ऋतिका स्वावलंबी मुलगी, आपल्याला कोणाचीच गरज नाही अशा आविर्भावात सगळं करत असते. तर आशय तिला उत्तम साथ देत असतो. मात्र जेव्हा आशयच्या पायाला दुखापत होते तेव्हा मात्र दोघांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे हे जाणवतं. मग येतात माधव तांबे(गिरीश ओक) आणि उमा (निवेदिता सराफ). आता यांचं ऋतिका आणि आशयशी काय नातं असतं हा सिनेमातील ट्विस्ट आहे. माधव आणि उमा ही जुनी पिढी आशय आणि ऋतिका या मधल्या फळीतील पिढीला बरंच काही शिकवून जाते. जगात सर्वात शेवटपर्यंत राहणारा कोणता आजार असेल तर तो आहे 'एकटेपणा'. तसंच नात्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी एकमेकांचा सहवास किती आवश्यक आहे, हे या सिनेमातून सांगण्यात येतं.

दिग्दर्शन- सिनेमा सुरुवातीपासूनच धीम्या गतीने चालतो. जवळपास संपूर्ण सिनेमा हा भावनिक, हळवा आहे. त्यामुळे हलकेफुलके प्रसंग अगदी मोजकेच आहेत. लंडनमधलं चित्रीकरण असलं तरी ठराविक ठिकाणीच शूटिंग झाल्याचं लगेच कळून येतं. सिनेमातील संगीतही फारसं लक्षात राहत नाही.

अभिनय - सिनेमात सर्वच ताकदीचे कलाकार आहेत. उमेश सातत्याने रंगभूमीवर काम करत असल्याने त्याने सहज अभिनय आणि खास पंचेसमधून आशयची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. सिनेमातील गंभीर आणि डोळ्यात पाणी आणणारे सीन्स प्रिया बापटने लीलया पेलले आहेत. गिरीश ओक यांची भूमिका ही 'जुळून येतील रेशीमगाठी'मालिकेतील 'नानांचे ज्ञानामृत'ची आठवण करुन देणारी आहे. निवेदिता सराफ यांची प्रेमळ आणि तितकीच परखड भूमिका लक्षात राहणारी आहे. सिनेमात संजय मोने, सुकन्या मोने यांनी आशयच्या आईवडिलांची छोटी भूमिका उत्तम साकारली आहे.
 
सकारात्मक बाजू - सिनेमातून मिळणारी महत्वाची शिकवण, अभिनय 

नकारात्मक बाजू - धीमी गती, ओढून ताणून आणलेले विनोद, संगीत

थोडक्यात सांगायचं तर सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे. खऱ्या आयुष्यात नात्यांबद्दल विचार करायला लावणारा आहे.

Web Title: Umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta marathi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.