Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू

By ऋचा वझे | Updated: November 28, 2025 17:15 IST2025-11-28T16:52:24+5:302025-11-28T17:15:23+5:30

Tere Ishq Mein Movie Review: धनुषचा दमदार अभिनय, पण सिनेमाच्या कथेनेच केली माती?

tere ishk mein review starring dhanush and kriti sanon directed by anand l rai | Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू

Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू

Release Date: November 28,2025Language: हिंदी
Cast: धनुष, क्रिती सेनन, प्रकाश राज
Producer: भूषण कुमारDirector: आनंद एल राय
Duration: २ तास ४९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

Tere Ishq Mein Movie Review: आनंद एल राय आणि धनुष ही जोडी म्हटलं की 'रांझणा' हा कल्ट सिनेमा आठवतो. धनुषचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, दर्जेदार गाणी, कथा यामुळे सिनेमा सुपरहिट झाला. हीच जोडी आता 'तेरे इश्क मे' सिनेमा घेऊन आली आहे. सिनेमात धनुषसोबत क्रिती सेनन झळकली आहे. पण सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरलाय का? वाचा रिव्ह्यू 

कथानक - सिनेमा तब्बल पावणे तीन तासांचा आहे. इंडियन एअर फोर्समध्ये असलेला शंकर(धनुष) जो कामात परफेक्ट पण वरिष्ठांच्या आदेशांचं पालन न करणारा तापट स्वभावाचा असतो. शंकरचं काऊंसिलिंग व्हावं म्हणून त्याचे वरिष्ठ अधिकारी सरकारकडे अर्ज करतात. सरकारकडून मुक्ती (क्रिती सेनन)ला पाठवण्यात येतं. मुक्ती गरोदर अवस्थेत असतानाही दारु-सिगारेटची नशा करत असते. शंकरची आणि मुक्तीची आठ वर्षांपूर्वीची कॉलेजची ओळख असते. मुक्ती काऊंसिंलिंगसाठी शंकरसमोर येते आणि शंकरला तिला पाहून धक्काच बसतो. इथेच सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो.  

आठ वर्षांपूर्वी कॉलेज काळात मुक्ती पीएचडीचा अभ्यास करत असते. एखाद्या व्यक्तीचा हिंस्त्र स्वभाव बरा करता येतो हा तिचा विषय असतो. कॉलेजमध्ये शंकर मारामारी, तोडफोड करण्यासाठी प्रसिद्ध असतो. मुक्ती शंकरचीच केस स्टडी करते. त्याच्यासोबत फिरते, प्रेमाने वागते पण हे सगळं ती तिच्या पीएचडीसाठी करत असते. तर दुसरीकडे शंकर तिच्या प्रेमात पडतो. मुक्ती सुद्धा आपल्या प्रेमात आहे असा शंकरचा गैरसमज होतो.  माझं तुझ्यावर प्रेमच नाही आणि कधीच नव्हतं असं ती शंकरला सांगते. दरम्यान शंकरच्या  वडिलांचं निधन होतं.  प्रेमभंगाच्या दु:खात वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो थेट एअर फोर्सची परीक्षा देतो. ट्रेनिंग घेतो आणि तेजस फायटर जेट चालवणारा बेस्ट ऑफिसर बनतो. पण आता अचानक मुक्तीला पाहून त्याच्या जुन्या जखमा जाग्या होतात.  मुक्ती परत त्याच्या आयुष्यात का येते? ती कोणापासून गरोदर असते? शंकर सिनेमात जिवंत राहतो की मरतो? हे सगळे प्रश्न क्लायमॅक्समध्ये सुटतात.

लेखन दिग्दर्शन - सिनेमाने पटकथेतच मार खाल्ला आहे. क्लायमॅक्सला तर सिनेमा अगदीच ढासळला आहे. दिग्दर्शनाच्या बाबतीत आनंद एल राय यांनी नेहमीप्रमाणे चोख काम केलं आहे. मूळ सिनेमाची पटकथा अतिशय गुंतागुंतीची आहे. शिवाय काही संवाद अगदीच बाळबोध आहेत. सिनेमा पहिल्या भागात टेक ऑफ घेतो तर दुसऱ्या भागात अक्षरश: तोंडावर आपटतो. ए आर रहमान यांचं संगीत असूनही गाणी लक्षात राहत नाहीत.

अभिनय - धनुषचा अभिनय सिनेमाची जमेची बाजू आहे. 'रांझणा'मधली धनुषची निरागसता यामध्ये फारशी दिसत नाही. पण तरी त्याच्या अभिनयाला तोड नाही. क्रिती सेनननेही त्याच्या बरोबरीचं काम केलं आहे. पण तिची मुक्ती ही भूमिका पटकथेतच मार खाते त्यामुळे तिचा अभिनय बाजूलाच पडतो. काही वेळासाठी आलेल्या झीशान अय्युबचा कॅमिओ डोळ्यात पाणी आणणारा आहे. प्रकाश राज यांनी धनुषच्या वडिलांची भूमिका छान निभावली आहे. 

सकारात्मक बाजू - अभिनय, काही संवाद 

नकारात्मक बाजू -  कथा-पटकथा, संगीत, सिनेमाची लांबी

थोडक्यात 'रांझणा'सारखी अपेक्षा घेऊन जाल तर तुमचा केवळ अपेक्षाभंग होईल हे नक्की. 

Web Title: tere ishk mein review starring dhanush and kriti sanon directed by anand l rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.