Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

By ऋचा वझे | Updated: January 17, 2025 13:27 IST2025-01-17T12:34:53+5:302025-01-17T13:27:36+5:30

सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर

kangana-ranaut-emergency-movie-review-where-actress-played-role-of-former-prime-minister-indira-gandhi | Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

Release Date: January 17,2025Language: हिंदी
Cast: कंगना राणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, विशाक नायर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी
Producer: कंगना राणौत, रेणु पिट्टीDirector: कंगना राणौत
Duration: २ तास २६ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज झाला आहे. कंगना आता केवळ अभिनेत्री नाही तर भाजपाची खासदार आहे. या पदावर असताना तिचा 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज होतो म्हणल्यावर यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविषयी आगपाखड केली असणार असं तुम्हालाही वाटत असेल तर थांबा... सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' असलं तरी यामध्ये इंदिरा गांधींची भावनिक बाजू दाखवण्यात आली आहे. ती नेमकी कशी वाचा सिनेमाचा सविस्तर रिव्ह्यू.

कथानक: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. १९१७ ते १९८४ हा त्यांचा जीवनप्रवास. १९६२ साली चीन-भारत युद्धात इंदिराचं झालेलं कौतुक, त्यानंतर इंदिरा आणि वडील पंडित जवाहरलाला नेहरु यांच्यातील मतभेद, इंदिरा आणि पती फिरोज गांधी यांच्यात उडणारे खटके, आपली आई कमला नेहरु यांना वाईट वागणूक मिळत असल्याचा मनातला राग ही इंदिरा गांधींची कधीही न पाहिलेली बाजू सिनेमात दिसते. 'गुंगी गुडिया' असं त्यांना स्वत:च्याच पक्षातील लोक मागून बोलायचे तेव्हा त्यांचा संयम ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दिसतो. भारत-पाक युद्ध, अमेरिका, फ्रान्स, लंडन या देशांतील राष्ट्राध्यक्षांना दिलेलं चोख उत्तर ही त्यांची जमेची बाजू्. मात्र १९७५ पासून २१ महिन्यांसाठी इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या 'आणीबाणी'मुळे त्या देशासाठी 'व्हिलन' ठरवल्या जातात . विरोधी पक्षातील जयप्रकाश नारायण(अनुपम खेर), अटल बिहारी वाजपेयी(श्रेयस तळपदे), जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या आंदोलनकर्त्यांना बळजबरी तुरुंगात टाकणं ते सामान्यांवरील अत्याचार. धाकटा मुलगा संजय गांधी यांची तानाशाही, नसबंदी सारखा घेतलेला निर्णय, देशात भीतीचं वातावरण हे सर्व पैलू सिनेमात दाखवण्यात आले आहेत.

नाव 'इमर्जन्सी' असलं तरी हे सर्व प्रसंग अगदी कमी दाखवण्यात आले असून इंदिरा गांधींची यावेळी मानसिक स्थिती कशी होती यावर जास्त प्रभाव टाकण्यात आला आहे. इथेच सिनेमा थोडा इंदिरा गांधीच्या बाजूने झुकल्यासारखा वाटतो. यानंतर भाजपाची सत्ता पाडून इंदिरा गांधींचं पुन्हा सत्तेत येणं, संजय गांधींना दूर ढकलणं, त्यांचा मृत्यू ते राकेश शर्माची अंतराळ झेप हे सर्व प्रसंग एकामागोमाग एक दिसतात. शेवटी शीख समुदायाविरोधातील काही सीन्स नक्कीच त्यांना नक्कीच खटकू शकतात. एकूणच 'इमर्जन्सी' असूनही इंदिरा गांधी सिनेमात 'हिरो'च दिसल्या आहेत. सिनेमाचं नाव 'इंदिरा' जास्त शोभून दिसलं असतं असं वाटतं.

अभिनय: कंगनाने सिनेमात 'इंदिरा गांधींनाच आपण पडद्यावर पाहतोय इतका दमदार परफॉर्मन्स दिला आहे. त्यांचं दिसणं, नर्व्हस असताना ओठांची हालचाल छान साकारलं आहे. जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेतील अनुपम खेर, वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे यांनीही मिळालेल्या स्क्रीनस्पेसमध्ये चांगलं काम केलं आहे. सतीश कौशिक, तसंच सॅम माणिकशॉच्या भूमिकेत काही वेळासाठी दिसलेला मिलिंद सोमणही भाव खाऊन गेला आहे. संजय गांधींच्या भूमिकेत दिसलेल्या विशाक नायरचं विशेष कौतुक.

दिग्दर्शन: दिग्दर्शनाच्या बाबतीत कंगनाने ही भूमिकाही लीलया पेलली आहे. तरी काही प्रसंगांमध्ये दाखवलेली हिंसात्मक दृश्य खूपच अंगावर येणारी आहे.  संसदेतील सीन्स, वाजपेयी-इंदिरा भेटीचा सीन, इंदिरा-संजय गांधी यांच्यातील संभाषण असे काही सीन्स उत्तम जमले आहेत. 

थोडक्यात काय तर सिनेमा कंगनाचा आहे म्हणजे काँग्रेसविरोधात असेल असं समजू नका. इंदिरा गांधींची वेगळी बाजू ज्यांना पाहायची असेल त्यांनी सिनेमा नक्कीच पाहावा.

सकारात्मक: अभिनय, दिग्दर्शन, संवाद, गाणी 
नकारात्मक: सिनेमाचं मूळ असणाऱ्या 'इमर्जन्सी' या बाबींचा विषय मांडणीत अभाव

Web Title: kangana-ranaut-emergency-movie-review-where-actress-played-role-of-former-prime-minister-indira-gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.