Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: January 1, 2026 10:05 IST2026-01-01T10:02:14+5:302026-01-01T10:05:02+5:30

धर्मेंद्र यांचा अखेरचा सिनेमा म्हणून इक्कीसची खूप उत्सुकता होती. पण हा सिनेमा थिएटरमध्ये खरंच पाहण्यासारखा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा रिव्ह्यू

ikkis movie review starring dharmendra agastya nanda jaideep ahlawat | Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू

Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू

Release Date: January 01,2026Language: हिंदी
Cast: धर्मेंद्र, अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, दीपक डोब्रियाल, सिमर भाटिया
Producer: दिनेश विजान, मॅडॉक फिल्मसDirector: श्रीराम राघवन
Duration: २ तास २७ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

देवेंद्र जाधव>>>

कलाकार जातो आणि मागे उरतात त्याने साकारलेल्या भूमिका. त्यामुळेच एखादा कलाकार आपल्यात नसला तरीही त्याच्या भूमिका पाहून पुढील अनेक पिढ्यांचं मनोरंजन होतं. अशाच एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. तो अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. आपल्या सदाबहार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारे धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा शेवटचा सिनेमा. हा सिनेमा खरंच थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे का? जाणून घ्या

कथानक

सर्वात लहान वयात परमवीर चक्र मिळालेले सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची शौर्यगाथा आपल्याला 'इक्कीस'मध्ये बघायला मिळते. चित्रपटाची सुरुवात होते, तेव्हा निसार नावाचा पाकिस्तानी अधिकारी वरिष्ठांची परवानगी घेऊन अरुण खेत्रपाल यांचे वडील आणि माजी ब्रिगेडीयर मदन लाल यांना पाकिस्तान येण्याचं आमंत्रण देतो. निसारच्या आमंत्रणानुसार मदन लाल लाहोरमध्ये जातात.

आपला मुलगा पाकिस्तानच्या याच भूमीत शहीद झाला, याची मदन यांना जाणीव आहे. त्यामुळे मदन लाल यांच्यासाठी पाकिस्तान येण्याचं भावनिक कारण असतं. पुढे सिनेमा भूतकाळात जातो. वाढदिवसासाठी घरी आलेल्या अरुण खेत्रपाल यांना युद्धाची घोषणा झाल्याने पुन्हा बॉर्डरवर बोलावलं जातं. रणगाडा चालवून शत्रूंना चांगलाच धडा शिकवण्याचं अरुण यांचं स्वप्न असतं. त्या दिवशी युद्धात अरुणसोबत काय घडलं, याची खरी कहाणी निसारला माहित असते. अरुण शहीद होण्यामागे नेमकं काय कारण असतं? निसार हा नक्की कोण असतो? याची उत्तरं तुम्हाला 'इक्कीस' बघून मिळतील.

लेखन-दिग्दर्शन

'अंधाधुन', 'जॉनी गद्दार', 'एक हसीना थी' यांसारखे रहस्यमयी थ्रिलर सिनेमे बनवणारे श्रीराम राघवन यांनी 'इक्कीस' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. आपल्याला काय दाखवायचं हे श्रीराम राघवन यांना पक्क ठाऊक असल्याने त्यांनी भूतकाळ-वर्तमानकाळातील प्रसंगांचा खेळ दाखवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय. सिनेमाच्या शेवटी काय होणार, हेही आपल्याला माहित असतं, तरीही कथानकाची मांडणी आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

एखादं युद्ध जेव्हा घडतं तेव्हा सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबाची कशी होरपळ होते, हे श्रीराम यांनी 'इक्कीस'मधून भावनिकरित्या मांडलं आहे. त्यामुळे 'इक्कीस' आजवरच्या युद्धपटांपेक्षा वेगळा ठरतो. सिनेमातील संवाद आणि काही प्रसंग विचार करायला भाग पाडतात.

अभिनय

'इक्कीस' हा फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांचा सिनेमा आहे. धर्मेंद्र यांना 'इक्कीस'मध्ये जास्त स्क्रीनटाईम आहे. शांत, संयमी आणि मनाने खंबीर असलेल्या मदन लाल यांच्या भूमिकेत धर्मेंद्र यांचा अभिनय पाहणं ही एक पर्वणी आहे. प्रत्येकवेळी धर्मेंद्र जेव्हा दिसतात तेव्हा ते छाप पाडतात. काही प्रसंगात धर्मेंद्र यांनी काहीही संवाद न बोलता फक्त हावभावातून मनातील अस्वस्थता दर्शवली आहे.

अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत अगस्त्य नंदाने चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रसंगात मात्र अगस्त्यची संवादफेक स्पष्टपणे कळत नाही. याशिवाय भावनिक प्रसंगात अगस्त्य अभिनयात कुठेतरी कमी पडतो. जयदीप अहलावतने पाकिस्तानी अधिकारी निसारची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. जयदीपचे धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक सीन्स आहेत. त्यावेळी जयदीपने संयत अभिनय करत धर्मेंद्र यांच्या भूमिकेला दिलेलं महत्व जाणवतं.

सिमर भाटियानेही पदार्पणाच्या सिनेमात चांगला अभिनय केला आहे. छोट्याश्या भूमिकेत अभिनेते असरानी यांचाही अफलातून अभिनय बघायला मिळतोय. धर्मेंद्र आणि असरानी या दोन दिवंगत अभिनेत्यांना शेवटचं एकत्र पाहताना आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावतात.

सकारात्मक बाजू: अभिनय, कथा, युद्धाचे प्रसंग, धर्मेंद्र यांची अदाकारी
नकारात्मक बाजू: संथ गती, गाणी

थोडक्यात काय तर, भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेते धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा सिनेमा थिएटरमध्ये आवर्जून बघा. हा सिनेमा तुम्हाला अंगावर काटा आणणारे चित्तथरारक यु्द्धप्रसंग दाखवतोय शिवाय युद्धामागची दुसरी बाजू दाखवून तुम्हाला भावुकही करतो. सिनेमा संपल्यावर धर्मेंद्र यांचं एक वाक्य लक्षात राहतं ते म्हणजे, ''युद्ध केव्हा थांबेल? जेव्हा आपण थांबू...''

Web Title: ikkis movie review starring dharmendra agastya nanda jaideep ahlawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.