'दे दे प्यार दे'मध्ये २१ वर्ष मोठ्या अजय देवगणसोबत रोमान्स, झाली ट्रोल; रकुल प्रीत सिंह म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:14 IST2025-12-11T16:13:10+5:302025-12-11T16:14:25+5:30
रकुल प्रीत सिंहची रोखठोक प्रतिक्रिया

'दे दे प्यार दे'मध्ये २१ वर्ष मोठ्या अजय देवगणसोबत रोमान्स, झाली ट्रोल; रकुल प्रीत सिंह म्हणाली...
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'दे दे प्यार दे २' काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. सिनेमात आर माधवन रकुलच्या वडिलांच्या भूमिकेत होता. सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. याचा पहिला भागही तुफान गाजला होता. सिनेमात रकुल प्रीतने २१ वर्ष मोठ्या अजयसोबत रोमान्स केला आहे. त्याच्यासोबत रोमँटिक सीन्स करणं कठीण होतं का? यावर नुकतीच तिने प्रतिक्रिया दिली आहे.
'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत रकुल प्रीत सिंह म्हणाली, "सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांचं प्रेम मिळालं. या सिनेमात माझी भूमिकाही चांगली होती. अभिनेत्रींना फार कमी वेळा अशा भूमिका करायची संधी मिळते. यापुढेही मला चांगल्या भूमिका मिळतील अशी आशा आहे."
अजयसोबत रोमान्सवर ती म्हणाली, "मी खऱ्या आयुष्यात असे अनेक कपल्स बघितले आहेत ज्यांच्या वयात खूप अंतर आहे. असा कंटेंट घेऊन सिनेमा बनवणं कठीण असतं. लोक अशी नाती खूप सहज स्वीकारतात हे आम्ही सिनेमात कुठेही दाखवलेलं नाही. याचा काय परिणाम होतो, काय नुकसान होतं हे सगळं आम्ही दाखवलं आहे. मला वाटतं सिनेमाकडे मनोरंजन म्हणूनच बघावं. समाजाचा आरसा म्हणून बघू नये. अॅक्शन सिनेमा पाहिल्यावर लगेच आपण रस्त्यावर बंदुका चालवत नाही. काही सिनेमे परिणाम सोडणारे असतात तर काही फक्त मनोरंजनासाठी असतात."
"अभिनय हे जरा विचित्र प्रोफेशनल आहे. अॅक्शन आणि कट यामध्ये तुम्ही वेगळ्या भूमिकेत असता. तो स्विच कसा येतो हे मलाही माहित नाही. सीनमध्ये रडण्याचा सीन असेल तर त्याआधी आम्ही हसत असतो. सेटवर गोंधळ असतो. पण जसा कॅमेरा ऑन होतो एकदम तुमच्यामध्ये तो स्विच येतो. अजय सर नेहमीच माझ्यासाठी सीनिअर असतील. त्यांचं काम बघतच मी मोठी झाली आहे. ते सुपरस्टार आहेत. त्यांच्यासाठी माझ्या मनात कायम आदर असेल,"असंही ती म्हणाली.