"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:47 IST2025-11-07T10:44:46+5:302025-11-07T10:47:27+5:30
एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असं राज ठाकरे पिट्याभाईला म्हणाले अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईने मौन सोडलंय

"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी यांना सुनावल्याची चर्चा रंगली. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष असलेले परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले. राज ठाकरे म्हणाले, ''छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे. असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा''. अखेर यावर रमेश परदेशींनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रमेश परदेशी म्हणाले, ''ही अत्यंत अंतर्गत बैठक होती. आमचे फोन स्वीच ऑफ होते. शाखाध्यक्षांनी निवडणुकांच्या अनुषंगाने याद्यांवर काम करायला पाहिजे, जेणेकरुन निवडणुकांना सामोरं जाताना आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये, यासंदर्भात साहेब बोलत होते.''
''तुम्हाला माहितीये की, राज ठाकरे किती मिश्किल आहेत. म्हणजे टायमिंगमध्ये त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही. त्यांचं पटकन माझ्याकडे लक्ष गेलं. काय रे, तो फोटो, असं म्हणाले. मी संघ स्वयंसेवक आहे, ही गोष्ट मी लपवून ठेवली नाही. पक्षस्थापनेच्या आधीपासून मी साहेबांसोबत काम करतोय. त्यामुळे माझे संस्कार आणि जे मी काम करतो, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. काय रे, तुम्ही बाबा काय करता, अशी त्यांची जी पद्धत आहे बोलायची त्यात ते बोलले. त्यात हे सगळं कानपिचक्या वगैरे कुठून आलं! असं काही घडलेलं नाही. तो फोटो यावर्षीच्या संघाच्या दसरा संचालनातला होता.''
''राज ठाकरे मला असं काही म्हणाले हे साफ चुकीचं आहे. असा एकही शब्द त्यांच्याकडून आलेला नाही. मी तुम्हाला सर्व अॅक्ट करुन दाखवलं. पिट्याभाई असा माणूस आहे की त्याला शत्रू असण्याचं कारण नाही. माझी कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. अंतर्गत पद्धतीने घडलेला विषय, अतिशय गोपनीय ठेवलेली बैठक त्यातला हा विषय अशा पद्धतीने बाहेर का आला, हे मी माझ्या नेत्यांना विचारेन. या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे. ज्यांनी कोणी हे बाहेर काढलं ते पक्षाचे शत्रू आहेत. साहेबांनी दिलेला आदेश आणि त्यांचा प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही.''
''असं काही घडलेलं नाही. साहेब कुटुंबप्रमुख या नात्याने कधीही आमचे कान धरु शकतात. कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण झाली नाही, अशी चर्चा बाहेर कशी आली. आमच्या पक्षाची कोअर कमिटी आहे त्यांना मी १०० टक्के विचारणार की, हे बाहेर कुठुन आलं आणि का आलं?'', अशा प्रकारे रमेश परदेशींनी त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.