Urvashi Rautela : "माझं हृदय जोरात धडधडू लागलं, भीती..."; युद्धातून जीव मुठीत धरुन मायदेशी परतली उर्वशी रौतेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:22 IST2026-03-10T13:15:46+5:302026-03-10T13:22:56+5:30

Urvashi Rautela : युद्धाच्या या भीषण परिस्थितीत कुवैतमधून बाहेर पडल्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना अपडेट दिले.

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र डागली जात आहेत. या युद्धाच्या भीषण परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कुवैतमध्ये अडकली होती, परंतु कसाबसा आपला जीव वाचवून ती तिथून बाहेर पडली.

उर्वशीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपबीती सांगितली आहे. युद्धाच्या या भीषण परिस्थितीत कुवैतमधून बाहेर पडल्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना अपडेट दिले.

अभिनेत्रीने सांगितलं की, भारतात परत येताना विमानात चढताना तिला खूप भीती वाटत होती आणि तिचे डोळेही पाणावले होते. एका व्हिडिओमध्ये ती आपले अश्रू पुसतानाही दिसली.

आपल्या भावना व्यक्त करताना उर्वशीने पोस्टमध्ये लिहिलं की, "विमानात बसेपर्यंत मी पूर्णपणे ठीक होते, पण जशी मी सेटल झाली, अचानक मला भीती वाटू लागली."

"अस्वस्थता जाणवू लागली आणि माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. का ते मला माहित नाही, पण अचानक मला खूप भीती वाटली. मला थोडं असुरक्षित आणि चिंता वाटत आहे. मला खरोखर तुमच्या प्रार्थनांची गरज आहे."

"जर माझं बोलणं तुम्हाला भावूक वाटत असेल किंवा काळजी वाटत असेल तर मी माफी मागते, मला फक्त वाटलं की मी माझ्या मनातील गोष्ट शेअर करावी."

"या काळात तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे." उर्वशी आता सुरक्षितपणे भारतात परतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कठीण परिस्थितीतून सुरक्षित परतल्यानंतर अभिनेत्रीने अधिकारी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, उर्वशी तिच्या प्रोफेशनल कमिटमेंट कुवैतला गेली होती. युद्धामुळे परिस्थिती बिघडली आणि ती तिथे अडकली. दिलासादायक बाब म्हणजे उर्वशी आता भारतात सुखरूप परतली आहे आणि ती पूर्णपणे ठीक आहे.