"होय, माझे विवाहित मित्र माझ्यासोबत...", 'तारक मेहता'तील 'बबीता'नं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:39 PM2022-09-27T16:39:49+5:302022-09-27T16:51:28+5:30

टेलिव्हिजन विश्वासातील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. असंच एक पात्र म्हणजे 'बबीता जी'. अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी बबीता हे पात्र अत्यंत खुबीनं साकारलं आणि ते प्रेक्षकांना आवडलं देखील. जेठालालचं 'बबीता जी'वर लट्टू होणं आणि त्यातून घडणारे मजेशीर किस्से लोकांना चांगलेच आवडतात.

'तारक मेहता'मध्ये जेठालालला बबीताच्या अवतीभोवती फिरताना पाहिलंच असेल. पत्नी दया किंवा बापूजींनी सांगितलेलं काम एकवेळ जेठालाल करणार नाही. पण बबीता जींनी सांगितलं की कोणतीही गोष्ट एका पायावर करायला जेठालाल तयार असतो. मालिकेत 'बबीता'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी नुकतंच एका मुलाखतीत रियल लाइफमधील 'जेठालाल'बद्दल एक किस्सा सांगितला.

खऱ्या आयुष्यातही 'बबीता' यांच्या मागे विवाहित मित्र लट्टू झालेले आहेत. याची कबुलीच मुनमुन दत्ता यांनी दिली आहे. आपले विवाहित मित्र कशापद्धतीनं आपल्याशी फ्लर्ट करतात आणि त्या कशापद्धतीनं त्यांना उत्तर देतात याची माहिती मुनमुन दत्ता यांनी या मुलाखतीत दिली.

आता मुनमुन दत्ता सुंदर दिसतात त्यामुळे चाहते सौंदर्याचं कौतुक करणारच. पण फ्लर्ट करण्यासही एक मर्यादा असते. ती मर्यादा पाळणं महत्वाचं असतं. जेणेकरुन समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाणार नाही. आपल्या विवाहित मित्रांचीही मी क्रश आहे असं मुनमुन दत्ता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

होय माझ्या काही विवाहित मित्रांना मी आवडते. ही गोष्ट माझ्या मित्रांनीही मला सांगितली आहे. कोणत्या महिलेला असं अटेन्शन मिळणं आवडणार नाही? माझे अनेक मित्र माझं कौतुक करतात. त्यात अनेकांचं लग्नही झालेलं आहे. पण ते काही मला नुकसान पोहोचवणारे मित्र नाहीत. त्यांचं कौतुक मला नुकसानदायक नाही. तू आमची क्रश आहेस असं ते मनमोकळेपणानं सांगतात. मीही त्यांना ओके म्हणून रिप्लाय देते", असं मुनमुन दत्ता म्हणाली.

मुनमुन दत्तानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगनं केली होती. फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या मुनमुन दत्ता यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण 'हम सब बाराती' या टेलिव्हिजन मालिकेतून केलं. याही सीरिअलमध्ये जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी देखील होते. याच मालिकेतून त्यांची दिलीप जोशी यांच्यासोबत ओळख झाली.

मुनमुन दत्ता यांना 'तारक मेहता'मध्ये आणणारे देखील 'जेठालाल'च आहेत. त्यानंतर मुनमुन दत्ता 'बबीता जी'च्या नावानं घराघरात पोहोचल्या. मुनमुन दत्ता आज फक्त मालिकेपूरत्या मर्यादित राहिलेली नाही. टेलिव्हिजन विश्वातील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे.

मुनमुन दत्ता स्वत:चं यूट्यूब चॅनल देखील चालवते. या चॅनलच्या माध्यमातून फिटनेस फंडे शेअर करते. व्यायाम आणि योगामुळे होणारे फायदे यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ती सांगते. तसंच आपले डाएट आणि स्किन केअर टिप्सही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.